बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या घटना वरचेवर समोर येत आहेत. आताही सोशल मीडियावर प्रसिध्द झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंगळुरूमध्ये अलीकडेच घडलेली छेडछाडीची घटना समोर आलीये. या व्हिडिओमध्ये रस्त्याने चालत असलेल्या मुलींना दोन मुलं छेडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ही मुलं बाईकवरून आलेली स्पष्ट दिसत आहेत.
@PadmajaJoshi Another Horror story from IT Capital #Bengaluru. CCTV showing woman being groped by the motorcycle rider. pic.twitter.com/7OjtvkWPVk
— Aashish (@Ashi_IndiaToday) March 22, 2017
हा चीड आणणारा प्रकार बंगळुरूच्या विजयनगर भागात घडला आहे. बाईकवरून आलेली ही मुलं लगेचच पळून गेली. याहीपेक्षा वाईट प्रकार म्हणजे जेव्हा या मुली तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या तेव्हा नेहमीप्रमाणेच तक्रार नोंदवून घ्यायला टाळाटाळ करण्यात आली. अजूनही त्यांची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचं वृत्त आहे.
भारताच्या सिलिकाॅन व्हॅलीचं शहर म्हणून ओळखलं जाणारं बंगळुरू शहरात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांमुळे या शहराच्या आदर्श शहर अशी असलेल्या इमेजला मोठा धक्का बसला आहे.
३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री बंगळुरूच्या ब्रिगेड रोड आणि एमजी रोडवर झालेल्या प्रकाराने सर्वात आधी बंगळुरूमधल्या या समस्येकडे सगळ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं होतं. या ठिकाणी न्यू ईयर सेलिब्रेशन नावाखाली जमलेल्या मद्यधुंद तरूणांच्या हजारोंच्या जमावाने तिथे असलेल्या महिलांवर हल्ला चढवला होता. या ठिकाणी १५०० पोलिसांचा ताफा असूनही त्यांना या जमावाला नियंत्रणात आणणं कठीण गेलं होतं.
या घटनेचं फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर देशभर बंगळुरूचं नाव खराब झालंच. पण २०१२ सालच्या निर्भया बलात्कार प्रकरणामुळे भारताची जगभर डागाळलेली प्रतिमा आणखीन काळवंडली गेली. या घटनेनंतर बंगळुरूमधली सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येणार असल्याची अपेक्षा होती. पण आता प्रकाशात आलेल्या घटनेनंतर अजूनही याबाबतीतत फारशी सुधारणा झालेली नसल्याचं स्पष्टपणे समोर येतं.