या वर्षांत अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या अगदी अनपेक्षितपणे महासत्तेच्या गादीवर आरुढ झालेले अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो की जगाच्या डोळ्यात पाणी आणणारे उद्धवस्त अलेप्पो शहर असो. पत्नीचा मृतदेह खांद्यावर वाहून नेणारे दाना माजी असो की जयललिता यांचे निधन सगळ्याच गोष्टी फारच धक्कादायक होत्या.
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. यात हिलरी क्लिंटन सारख्या अनुभवी राजकारणी व्यक्तीमत्वाला मात देत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बनले. अनेक राजकिय विश्लेषकांची भाकिते आणि एक्सिट पोल साफ खोटे ठरवत या महासत्तेच्या गादीवर डोनाल्ड ट्रम्प जाऊन बसले. त्यांच्या विजयाने अमेरिकाच काय पण संपूर्ण जगालाच धक्का बसला.
ब्रेक्झिट
जुलै महिन्यांच्या शेवटी ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला. ब्रिटनमधील नागरिकांनी महासंघातून बाहेर पडावे याच बाजूने कौल दिला. आणि ब्रिटनच्या या ब्रेक्झिटने सगळ्या जगाला धक्का दिला. २८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन महासंघामधून ब्रिटन बाहेर पडला याचे संभाव्य परिणाम देखील वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले.
फसलेले तुर्की बंड
जुलै महिन्यात तुर्कस्तानात अध्यक्ष रिसीप तय्यीप एर्दोगन यांच्या विरोधात लष्कराने बंड केले होते. रातरोत हे बंड चिरडूनही टाकण्यात आले. सरकारविरोधातील बंडात १६१ नागरिक व सैनिक मारले गेले होते. लष्कराने एर्दोगन यांची सत्ता उलथवून इस्तंबूल व अंकारा या महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. एर्दोगन यांच्या तेरा वर्षांच्या पंतप्रधान काळात एवढे मोठे बंड झाले नव्हते.
निर्वासितांचे लोंढे
सीरियामध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या संघर्षांची झळ हळूहळू युरोपीय देशांना देखील बसू लागले. त्यामुळे दरदिवशी लाखो निर्वासितांचे लोंढे युरोपीय देशात जाऊ लागले. अशातच जर्मनी आणि इतर देशांच्या सीमेवर निर्वासित आणि स्थानिकांमध्ये खटके उडू लागले. तर यावर्षी अलेप्पो शहरांवर विजय मिळवल्यानंतर इथले भिषण वास्तव जगासमोर आले.
फ्रान्स हल्ला
फ्रान्सच्या राष्ट्रदिनादिवशी जमलेल्या जमावात ट्रक घुसवून एका माथेफिरूने ८५ हून अधिक जणांना ठार केले होते. १०० हून अधिक जखमी झाले आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रदिनादिवशी हजारो लोक नीस येथे जमले होते तेव्हा या गर्दीत एका माथेफिरून ट्रक घुसवला होता. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक लोक जखमी झाले होते.
पत्नीचा मृतदेह १२ किलोमीटर खांद्यावर वाहून नेण्याची पतीवर वेळ
ओडिशातील कलाहंडी गावात राहणा-या दाना मांजी यांना आपल्या पत्नीचा मृतदेह १२ किलोमीटर खांद्यावर वाहून नेण्याची वेळ आली होती. पत्नीचा मृतदेह घरी घेऊन जाण्याइतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते तसेच रुग्णालयातील अधिका-यांना वारंवार विनंती करूनही त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकून त्यांनी नेला होता.
जयललिता यांचे निधन
एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तामिळनाडूवर शोककळा पसरली. २२ सप्टेंबररोजी ताप आल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते.