प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. मात्र, प्रेमाच्या नादात प्रेमी असं काही करून जातात की लोकांना धक्काच बसतो. नुकतंच राजस्थानमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर लग्न करण्यासाठी सर्व सीमा पार केल्या आहेत. यानंतर ‘प्रेम आंधळं असतं’ यावर आपला नक्कीच विश्वास बसेल. हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.
राजस्थानच्या भरतपुर भागामध्ये राहणाऱ्या मीराने लिंग परिवर्तन करून आपल्या प्रेयसी बरोबर लग्न केले आहे. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनीही या लग्नाला सहमती दर्शवली आहे. भरतपुर येथील एक शाळेत मीरा क्रीडा शिक्षिका आहेत. आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कल्पना फौजदार हिच्याशी लग्न करण्यासाठी तिने लिंग परिवर्तन केले. यानंतर मीराने आपले नाव असे आरव कंतुल केले आहे. मीराने प्रसारमध्यमांना सांगितलं की “प्रेमामध्ये सर्वकाही माफ असतं.”
मीरा म्हणजेच आताचा आरव आणि कल्पना यांच्या प्रेमाची सुरुवात खेळाच्या मैदानातून सुरू झाली. आरव म्हणाला की शाळेच्या मैदानात कल्पनाशी बोलतानाच तो तिच्या प्रेमात पडला. आरव म्हणाला की त्याला आधीपासूनच मुलगा व्हायचे होते. त्याच्या म्हणण्यानुसार, तो मुलीच्या रूपात जन्माला आला, मात्र त्याला नेहमी वाटायचे की तो मुलगा आहे. त्याला आधीपासूनच लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करायची होती. डिसेंबर २०१९ मध्ये त्यावर पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाली.
यावर कल्पनाचे मत विचारले असता ती म्हणाली की तिचे आरववर खूप प्रेम आहे. त्याने लिंग परिवर्तन केले नसते तरीही तिने आरवबरोबरच लग्न केले असते. तसेच आरवच्या शास्त्रक्रियेच्या वेळेस कल्पना त्याच्याबरोबरच होती. तथापि, आरव आणि कल्पना यांचे लग्न भारतात अपारंपरिक असून फार कमी लोक असे पाऊल उचलण्याचे धाडस करतात. दरम्यान, कल्पना ही राज्यस्तरीय कबड्डीपटू आहे. अशीही बातमी मिळाली आहे की कल्पना येत्या जानेवारी महिन्यात एका आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी दुबईला जाणार आहे.