Shocking Video: जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना कुठेही बाहेर सोडत असाल, तर त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवा. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजेचा धक्का बसल्याने एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुलाच्या अचानक मृत्यू झाल्याच्या घटनेने कुटुंबीयांना जोरदार धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, तनवीर नावाच्या एका विद्यार्थ्याचा गंभीररीत्या भाजल्याने जागीच मृत्यू झाला; तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने दोन्ही मुलांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, जेथे त्या गंभीर जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मुले थेट विजेच्या तारेला स्पर्श करताच सायकलवरून पडताना दिसत आहेत. काही क्षणांनंतर एका विद्यार्थ्याच्या शरीराला आग लागली; तर दुसरा मुलगा त्याच्या बाजूला निपचित पडला होता.
विद्युत तारेला स्पर्श अन् १० वर्षाचा मुलगा जागीच ठार
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुलं सायकलवरून येताना दिसत आहेत. यावेळी या दोन्ही मुलांचा संपर्क विजेच्या तारेशी येतो आणि काही कळायच्या आतच दोघेही रस्त्यावर पडतात. यावेळी त्यातल्या एकाच्या शरीराला तर आग लागते; तर दुसरा खाली कोसळतो. हे पाहून एक बाईक चालक मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे; मात्र आग लागल्यामुळे तो काहीच करू शकला नाही. त्या आगीमध्ये तो १० वर्षांचा मुलगा तर जागीच ठार झाला. हळूहळू करीत तिथे लोक जमले आणि त्यांनी या चिमुकल्यांवर पाणी टाकून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं.
या घटनेमुळे रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी या अपघातासाठी वीज अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलं आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या ते या घटनेच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास करीत आहेत. स्थानिकांनी तारा हटवण्याची त्वरित कार्यवाही केल्यामुळे पुढील जीवितहानी टळली असली तरी खूप उशीर झाला होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बिडी पेटवल्यानंतर काडी रस्त्यावर फेकली अन् पुढच्या क्षणी…; VIDEO पाहून सिगारेट ओढणाऱ्यांना घाम फुटेल
आंध्राच्या मंत्र्यांची प्रतिक्रिया
एका निवेदनात आंध्रचे मंत्री नारा लोकेश यांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक आणि दु:ख व्यक्त केलं आहे. जखमी विद्यार्थ्यासाठी सरकार शक्य तितकी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवील, असं आश्वासनही त्यांनी दिलं आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पावले उचलली जातील. असंही सांगितलं.
© IE Online Media Services (P) Ltd