मृत्यू कोणाला चुकला आहे? कोणाचा काळ कधी येईल हे सांगता येत नाही. चालता-बोलता अचानक एखाद्या व्यक्तीला हॉर्ट अटॅक येतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. अशा घटना गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडत आहे. काही दिवसांपूर्वी लग्नाचा २५ वाढदिवशी पत्नीबरोबर नाचता नाचता एका व्यक्तीचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये भाषण देताना एका तरुणीचा हॉर्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. दरम्यान अशीच एक घटना पुन्हा घडली आहे.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ समोर आला आहे. शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी एका २१ वर्षीय बीटेक विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या विद्यार्थ्याचे नाव विनय कुमार असे आहे, जो राज्यातील खम्मम जिल्ह्यातील रहिवासी आहे. मेडचल येथील सीएमआर अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रिकेट सामना खेळत असताना कुमार अचानक कोसळला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये कुमार फिल्डिंग करत असताना कोसळल्याचे दिसून आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कुमार क्रिकेट मैदानावर आहे. तो कोणाला तरी हातवारे करताना दिसतो अन् पुढच्या क्षणी तो धाडकन जमिनीवर कोसळतो. त्याला पडल्याचे पाहताच सर्व खेळाडू धावतच त्याच्या जवळ येताना दिसत आहे.

कुमारला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी कुमारला मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय मूल्यांकनानुसार, कुमारच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे दिसून आले आहे. २१ वर्षीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पाहा Viral Video

व्हायरल व्हिडिओ एक्सवर Revanth Chithaluri @iRe1th नावाच्या खात्यावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,”मेडचल येथील सीएमआर कॉलेजच्या मैदानावर मित्राबरोबर क्रिकेट खेळत असताना एका २१ वर्षीय बीटेक विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.”

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एकाने कमेंट केली की,” कोराना लसीकरणांतर अशा समस्या होत असल्याचे दिसते.”

दुसऱ्याने कमेंट केली की, “इतकी मुलं आहेत आणि त्यापैकी कोणालाही सीपीआर माहित नव्हतं. सीपीआर त्याला वाचवू शकला असता.”