तेलंगणा येथील पेद्दापल्ली आरटीओ कार्यालयासमोर अनिल गौड नावाच्या एका ट्रकमालकाने आरोप केला की, वाहतूक अधिकारी लाच घेण्यासाठी त्याचा छळ करत आहेत. या छळाचा निषेध म्हणून तो त्याच्या ट्रकवर चढला आणि आरटीओ कार्यालयासमोर जिवंत विजेच्या तारा पकडून आत्महत्या करण्याची धमकी दिली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, ट्रकचालक त्याच्या ट्रकवर असलेल्या विजेच्या तारा पकडून आत्महत्या करण्याची धमकी देत ​​आहे. तो रागाच्या भरात त्याच्या ट्रकवरून पैसे फेकतानाही दिसत आहे व रागारागात न्यायाची मागणी करताना आणि हा भ्रष्टाचार थांबवण्याची विनंती करताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @TeluguScribe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांवर आरोप

FPJ च्या वृत्तानुसार अनिल गौड याने दावा केला की, आरटीओ अधिकारी प्रत्येक ट्रक मालकाकडून दरमहा ₹८,००० लाच मागत होते. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने अधिकाऱ्यांनी त्याच्या वाहनाविरुद्ध खोटा खटला दाखल केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्याने सांगितले की, सर्व आवश्यक कागदपत्रे असूनही त्याचा ट्रक अन्याय्यपणे जप्त करण्यात आला आहे.

आत्महत्येचा प्रयत्न आणि निषेध

परिस्थितीमुळे निराश होऊन अनिल गौडने आपल्या ट्रकवर चढून न्यायाची मागणी करत आत्महत्येचा प्रयत्न केला. वैध कागदपत्रे असतानाही त्याच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला, असा सवाल त्याने केला.

न्यायाची मागणी

निषेधानंतर अनिल गौड याने उच्च अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली. त्याने त्याचा ट्रक सोडावा आणि त्याला न्याय मिळावा अशी मागणी केली. या घटनेमुळे वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कृपया तेलंगणातील सर्व आरटीओवर छापे टाका. आरटीओ हा खूप भ्रष्ट विभाग आहे.” तर दुसऱ्याने “आरटीओवर कडक कारवाई करा”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “इथे लाच घेतल्याशिवाय आरटीओचं कोणतंच काम होत नाही; यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.”

Story img Loader