Viral video: आपल्या सभोवताली आपल्या प्राण्यांवर प्रेम करणारे आणि प्राण्यांना त्रास देणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. काही जण मात्र याउलट असतात. ते रस्त्याने जात असतानाही विनाकारण एखाद्या प्राण्याला त्रास देतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे. इंडोनेशियातील एका उद्यानात वन्यजीव सफारीदरम्यान एका पर्यटकाने पाणघोड्याच्या तोंडात प्लास्टिकची पिशवी फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील एक्स अकाऊंटवर हा संतापजनक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. माणूस स्वत:च्या मनोरंजानासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इंडोनेशियातील तामन सफारी पार्कमध्ये पाणघोडा काठावर उभा होता, यावेळी जेव्हा पर्यटकांचा समूह कारमधून त्या ठिकाणी आला तेव्हा कारमध्ये बसलेल्यांपैकी एकाने पाणघोड्याचे तोंड उघडताच त्याला गाजर खायला देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, कारमधून आणखी कोणीतरी प्लास्टिकची पिशवीही या जनावराच्या तोंडात फेकली. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पाणघोड्याने लगेचच पिशवी चघळायला सुरुवातही केली.
प्राणी प्लास्टिक खातात तेव्हा काय होते?
चुकून प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेकदा प्राण्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक गिळल्यामुळे त्यांचे पोट भरते आणि यामुळे भुकेची भावना कमी होते. परिणामी ते कमी खातात. त्यामुळे ते कमजोर होतात. प्लास्टिकच्या मोठया तुकडय़ांमुळे त्यांचा ‘गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक’ बंद होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिक शरीरातून पुढे जाऊ शकत नाही. त्यातच त्यांचा मृत्यू होतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं व्यक्ती अशी बचावली
दरम्यान, तमन सफारी पार्कचे प्रवक्ते अलेक्झांडर झुल्करनैन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “पर्यटकाची ओळख पटली आहे. आम्ही त्या व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या वाहनाची लायसन्स प्लेट पाहून त्याचा शोध घेतला आहे. त्या व्यक्तीने केलेल्या कृतीची त्याला माफी मागायला सांगणार आहे, त्यामुळे इतर पर्यटकही नियमांचं पालन करतील. तसेच या घटनेनंतर पाणघोड्याची तपासणी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती ठिक आहे.” असे अलेक्झांडर झुल्करनैन यांनी सांगितले.
तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त झाले आहेत. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देताना, एकाने म्हंटलंय की, “त्यांना सरळ तुरुंगात पाठवा,” अशा “पर्यटकांना अटक करावी” अशी मागणी केली आहे. तर आणखी एकानं “त्या लोकांना प्रत्येक सफारी पार्कमध्ये बंदी घातली पाहिजे आणि प्राण्यांच्या जवळ जाऊ देऊ नये.” अशी मागणी केली आहे.