Mumbai Local Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.
यात उशीर झाला म्हणून चालती ट्रेन पकडणारे प्रवासी अनेक असतात. अशात ज्यांना चालती ट्रेन कशी पकडायची हेच माहीत नसतं आणि दुसऱ्यांना बघून स्वत:पण असलं काहीतरी करायला जातात आणि स्वत:वर संकट ओढावून घेतात, अशी माणसंही अनेक आहेत. सध्या अशाच माणसाचं उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात चालती ट्रेन पकडण्याच्या नादात एका माणसाबरोबर काय घडतं, पाहा…
मुंबई लोकल पकडायला गेला अन्…
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस ट्रेनच्या दरवाजाला लटकत प्लॅटफॉर्मवर फरफटत जात आहे. चालती ट्रेन पकडण्याच्या नादात हे सगळं झालं असं व्हिडीओवरील कॅप्शनमुळे लक्षात येतंय. चालती ट्रेन पकडण्याच्या घाईत त्याचा पाय सटकला आणि ट्रेन वेगात असल्याने अक्षरश: ५०० मीटर तो माणूस प्लॅटफॉर्मवरून फरपटत गेला. ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली आणि कधी घडली हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @parivartan_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “चालत्या ट्रेनमध्ये चढायला गेला आणि पाचशे मीटर फरपटत गेला..” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तीन लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एवढी भयंकर घटना घडत असताना बाकीच्या लोकांनी ट्रेनमधली एमर्जन्सी चेन तरी ओढायची” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आशा आहे तो माणूस आता ठीक असेल.” तर तिसऱ्याने “चांगलीच शिक्षा मिळाली त्याला, आता परत असं कधी करणार नाही, आधी मुंबई लोकल कशी पकडायची ते शिका” अशी कमेंट केली.