सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंमध्ये लहान मुलं नवनवीन रील्स बनवताना दिसतात, तर काही व्हिडीओ त्यांच्या नकळत काढण्यात आलेले असतात. यातील बरेच व्हिडीओ खूप चर्चेत येतात.
सध्या रीलचं वेड लहानग्यांना इतकं लागलं आहे की, ते काळ वेळ न बघता रील शूट करत असतात. एखाद्या गंभीर परिस्थितीतही मग ते कसला विचार करत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा अपघात झाला तरी रील करणं थांबवत नाहीय.
अपघात झाला तरीही करतोय रील…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी कारचा अपघात झाल्याचं दिसतंय आणि या व्हिडीओत एक लहान मुलगा जखमी झालेला दिसतोय. इतका मोठा अपघात होऊनही तो मुलगा रील करताना दिसतोय. पुष्पा चित्रपटातील डायलॉगची कॉपी करत हा मुलगा अगदी बेधडकपणे व्हिडीओ बनवताना दिसत आहे. अपघात झाला, पण या लहानग्याचं रीलचं वेड काही सुटत नाही.
लहान मुलाचा हा व्हायरल व्हिडीओ @azadibachaonews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अपघातात जखमी झालेल्या बाळाने मारली पुष्पा स्टाईल” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बाळा, तू अजून खूप लहान आहेस, अपघात झाल्यावर काय होतं हे जगाला माहिती आहे”; तर दुसऱ्याने “आयुष्यात इतका आत्मविश्वास हवा” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “बाळा, पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जा.”