थंडीनंतर आता पुन्हा एकदा उकाडा सुरू झाल्यानं तुम्ही तुमचा एसी चालू केलाच असेल. पण, या उष्णतेपासून आराम मिळण्यासोबतच तुम्हाला दुसरं काही मिळालं तर…, सध्या एका माणसाला एसी चालू करताना असाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. जर तुम्हीदेखील खूप दिवसांनी एसी चालू केला असेल, तर सावधान! तुम्हाला हा भयानक अनुभव येऊ शकतो.
विशाखापट्टणम जिल्ह्यातील पेंडुर्थी येथे एअर कंडिशनर (एसी) युनिटमध्ये साप आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सत्यनारायण नावाच्या माणसाच्या घरी घडली. सत्यनारायण यांनी बराच काळ त्यांचा एसी वापरला नव्हता. पण, जेव्हा त्यांनी तो चालू केला तेव्हा आत एक साप आणि त्याची पिल्लं पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी ताबडतोब एका सर्पमित्राला कळवलं, ज्यानं तिथे येऊन साप आणि त्याच्या पिल्लांना काळजीपूर्वक एसीमधून बाहेर काढलं.
व्हायरल व्हिडीओ
ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा एसी तपासावासा वाटेल. व्हिडीओमध्ये एक माणूस एसीमधून साप आणि सापाची पिल्लं बाहेर काढताना दिसत आहे. त्या माणसाच्या हातात सुमारे आठ ते दहा पिल्लं असतात. मग तो माणूस साप व त्याच्या पिल्लांना एका पिशवीत भरतो आणि सोबत घेऊन जातो. यादरम्यान, घटनेची नेमकी वेळ अद्याप कळलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @TeluguScribe या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “आता नवीन भीतीबद्दल कळलं आहे.” दुसऱ्यानं, “आता ते एसी लावताना हजार वेळा विचार करतील”, अशी कमेंट केली.
या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांना धक्का बसला आहे आणि भीतीची जाणीव झाली आहे. ही घटना अशा लोकांसाठी एक इशारा आहे, जे बराच वेळानंतर एसी चालू करतात. त्यांनीही आत कोणता प्राणी लपलेला आहे का ते तपासून बघणे आवश्यक ठरले आहे.