Married Woman Threatened to Kill Husband: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हत्याकांडाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यासंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या ड्रम हत्याकांडावरून अनेक मीम्सदेखील बनत आहेत. तर अशाच प्रकारची अनेक प्रकरणदेखील पुढे येत आहेत. यादरम्यान, सध्या एका बायकोने आपल्याच नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एका ठिकाणी घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नवऱ्याला दिली धमकी…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला तिच्या पतीला धमकी देताना दिसत आहे, ज्यामध्ये ती त्याला २०० तुकडे करेल अशी धमकी देत आहे. या व्हिडीओमध्ये ऑनलाइन संताप आणि चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे घरगुती हिंसाचार आणि त्यामुळे दोन्ही जोडीदारांवर होणाऱ्या भावनिक परिणामांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे वृत्त आहे.
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की महिला म्हणते, “मी सोशल मीडियावर काही लपवत नाहीय. मला जन्मठेप झाली तरी चालेल फाशी मिळाली तरी चालेल. पण तुझी अशी अवस्था करेन की कोणत्याच मुलीने आपल्या नवऱ्याची केली नसेल. असा राग घेऊन मी जगतेय ना, माझे हात बांधलेले आहेत की माझी मुलं आहेत. नाहीतर मी तुझे एवढे तुकडे करीन ना, की कोणी बघूच शकत नाही. एवढा विचार कर तू. हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर तू दाखवशील ना…”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @indians या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “धक्कादायक व्हिडिओ समोर आला: पतीचे तुकडे करण्याची धमकी देणारी महिला कॅमेऱ्यात कैद, म्हणाली, मैं तुम्हारे २०० टुकडे कर दूंगी” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.५ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
महिलेचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे म्हणण्यामागे तिच्याही वेदना दडल्या असणार हे नक्की.” तर दुसऱ्याने “त्याने तिला तेवढा त्रास दिला असेल, म्हणूनच ती असं म्हणत आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “ती खरंतर पीडित आहे ती धमकावत नाहीय.”