Child Shocking Video: घरात लहान मुलं असली की कायम त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. कारण कधी कोणता वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. बाहेर असताना लहान मुलांची विशेष काळजी घेतली जाते त्यांना लागू नये, ते मस्ती करता करता कुठे पडू नये यासाठी त्यांच्यामागे एक माणूस असतोच. अशा वेळेस अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांना दुखापत होते.
चिमुकल्यांना जराही नजरेआड केलं तर होत्याचं नव्हतं होतं. अनेकदा लहान मुलांवर संकट ओढावतं आणि मग यामुळेच भयंकर गोष्टी घडतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात पालकांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकला मोठ्या संकटात अडकला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…
चिमुकल्याचा जीव धोक्यात
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, बिल्डिंगमधील एका घराच्या खिडकीमध्ये एका लहान मुलाचं डोकं अडकलंय. डोकं अडकल्यामुळे तो तसाच तिथे लटकत असल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय. त्या चिमुकल्याची मदत करायला बिल्डिंगखाली माणसांची गर्दीदेखील जमलीय. काही माणसं शिडीवर चढून चिमुकल्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येतं. चिमुकला ज्या घराच्या खिडकीमध्ये अडकला असतो, तिथूनच त्याला वर खेचलं जातं आणि त्याचा जीव वाचतो.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @its_prakash_kalawat या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “आपल्या मुलांना असं एकट्याला सोडून घरातून बाहेर निघू नका, जर मुलाला काही झालं असतं तर…” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.१ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
चिमुकल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुलांना सांभाळता येत नाही, मग जन्मच कशाला दिला”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अरे आई-वडिलांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे”, तर तिसऱ्याने “निष्काळजीपणामुळे मुलाचा जीव जाऊ शकतो, सावधगिरी बाळगा” अशी कमेंट केली.