Hand Hanging in Cars Boot Video: वाशी व सानपाडा या रेल्वेस्थानकांदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीच्या डिकीमधून हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नवी मुंबईतील एका रहिवाशानं रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केल्याचं वृत्त सध्या समोर आलं आहे.
डिक्कीतून हात बाहेर आला अन्…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका सफेद रंगाच्या गाडीच्या डिकीमधून अचानक एक हात बाहेर आला आहे. नवी मुंबईतील एका रहिवाशाला हा धक्कादायक प्रकार दिसताच क्षणी त्यानं याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच तो तुफान व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करणारा माणूस बोलतोय, “या गाडीच्या डिकीमधून एक हात निघाला आहे. बघा बघा… कदाचित हा मृतदेह आहे.”
हा व्हायरल व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर नवी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करताना वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सोमवारी संध्याकाळी ६.४५ वाजता शूट करण्यात आला होता. रात्री ८.३० च्या सुमारास पोलिसांनी घाटकोपरजवळ गाडीचा माग काढला आणि त्यांना आढळले की, सुमारे तीन मुले त्यांच्या लॅपटॉपची जाहिरात करण्यासाठी ‘रील्स’ बनवत होते.
“ही मुले मुंबईची होती आणि नवी मुंबईत ती लग्नासाठी आली होती. आम्ही त्यांना ताब्यात घेऊन वस्तुस्थिती पडताळली आहे आणि त्यात आम्हाला संशयास्पद असे काहीही आढळलेले नाही,” असे सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) अजय लांडगे यांनी सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व व्हिडीओज मिळवून, त्यांची पडताळणी केली. त्यांना आढळले की रीलमधील मजकूर असा होता की, जेव्हा एक दुचाकीस्वार गाडी थांबवतो आणि गाडीची डिकी उघडण्यास सांगतो तेव्हा प्रथम डिकीबाहेर एक हात लटकलेला दाखवला जातो. ज्या मुलाचा हात लटकलेला दाखवला जातो, तो मुलगा नंतर डिकी उघडतो आणि म्हणतो, “भीती वाटली? पण मी मेलो नाही. जिवंत आहे. तथापि, लॅपटॉपवर आमच्याकडे असलेली अद्भुत ‘ऑफर‘ ऐका.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @manunile या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल झाला असून, ‘कारच्या डिकीतून हात बाहेर? कारण काय?‘ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कोणाचातरी हात दिसतोय म्हणजे त्या व्यक्तीचं अपहरणदेखील केलं असू शकतं” तर दुसऱ्याने “व्हिडीओ काढण्याऐवजी त्या गाडीला थांबवा” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “पोलिंसाकडे तक्रार करा”