Pune Shocking Video: गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचं प्रमाण देशभरात वाढत चाललंय. त्यात आपल्याला हवी असणारी गोष्ट नाही मिळाली की माणसं कोणत्याही थराला जातात. अशी माणसं दुसऱ्यांचं नुकसान करायला अजिबात मागे पुढे बघत नाहीत. आणि आपलं तेच खरं करतात. या हट्टापायी अनेकदा ते इतरांचा जीवही धोक्यात टाकतात. सध्या अशीच घटना पुण्यात घडली आहे ज्यात एका तरुणाने तब्बल १३ दुचाकी जाळल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊ या…

तरुणाने हद्दच पार केली

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक तरुण मध्यरात्री पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीला आग लावत आहे. आग लावताच क्षणी दुचाकी पेट घेते आणि आगीचा भडका उडतो. काम फत्ते केल्यावर तो तरुण तिथून पळून गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. माहितीनुसार, ही घटना पिंपरीमधील एका सोसायटीमध्ये घडली असून आरोपीदेखील त्याच सोसायटीमध्ये राहत होता.

आरोपीचे नाव स्वप्निल शिवशरण पवार असे असून तो २७ वर्षांचा आहे. आईने ड्रग्जसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने तो राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांच्या डझनभर दुचाकी जाळून टाकल्या. ही घटना बुधवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान १३ वाहने जळून खाक झाली. रहिवाशांनी तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली.

…नाहीतर मी संपूर्ण इमारत जाळून टाकेन

स्वप्निलच्या आईने सांगितल्यानुसार, तो पहाटे २-३ च्या सुमारास घरी पोहोचला आणि त्याने आईकडे पैसे मागितले. जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने ते राहत असलेल्या संपूर्ण इमारतीला आग लावण्याची धमकी दिली.

आरोपीच्या आईने त्याला जामिनावर सोडू नये अशी विनंती पोलिसांना केली. “मी पोलिसांना विनंती करते की त्याला तुरुंगातून सोडू नका. आम्हाला बँकेचे कर्जही फेडायचे आहे. त्याला सोडू नका. जर त्यांनी त्याला सोडले तर तो आम्हाला आणि संपूर्ण इमारत जाळून टाकेल. त्याने समोरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांनाही जाळून टाकण्याची धमकी दिली आहे… सुदैवाने, रहिवाशांनी अजून आम्हाला घराबाहेर जाण्यास सांगितले नाही. जर त्यांनी आम्हाला बाहेर काढले तर आम्ही कुठे जाऊ हे मला माहित नाही,” असं ती म्हणाली.

स्वप्निलच्या भावानेही पोलिसांना अशीच विनंती केली. “गेल्या १० वर्षांपासून तो आमच्या कुटुंबाला त्रास देत आहे. त्याला गांजा आणि दारूचे व्यसन आहे. आम्ही त्याला अनेक वेळा पुनर्वसनासाठी पाठवले आहे, पण आता तो स्वतःला किंवा आम्हाला मारण्याची धमकी देतो. मी पोलिसांना विनंती करतो की त्याला सोडू नका. नाहीतर तो आम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. त्याने संपूर्ण इमारत जाळून टाकण्याची धमकीही दिली आहे,” असं तो तो म्हणाला.

एका रहिवाशाने सांगितले की स्वप्नीलला ड्रग्जचे व्यसन असले तरी तो हुशार आहे. “त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे… ते त्याला अनेक वेळा डॉक्टरकडे घेऊन गेले आहेत. त्याच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे,” असं तो म्हणाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की स्वप्निल सध्या पोलिस कोठडीत आहे.