Pune shocking video: अस्ताव्यस्त पडलेला कचरा, फुटक्या-तुटक्या कचराकुंड्य़ा, राडारोड्य़ाचे ढीगच्या ढीग, अस्वच्छ नदीपात्र, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि त्यांची कमतरता, सार्वजनिक इमारती आणि कार्यालयांमधील अस्वच्छता, भिंतींवर उमटलेल्या पिचकाऱ्या हे चित्र पुण्यात सर्रास पाहायला मिळतं. पुणे शहरात अस्वच्छतेची समस्या गंभीर आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकायला, कचराकुंडींची खराब अवस्था, आणि स्वच्छतेकडे दुर्लक्षित दृष्टीकोन यांमुळे पुणे शहर अस्वच्छ दिसते. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून सर्वच पुणेकरांची झोप उडेल. कारण तुम्ही जे पाणी पिताय त्या पाईपलाईनची अवस्था पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

पुण्यातील ज्योती चौकात असलेल्या पाईप लाईनच्या आजूबाजूला अतिशय अस्वस्छता पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर पाईपलाईन फुटली असून त्याठिकाणी डुक्करांचा वावर आणि तिथेच डुक्करं पाणी पिताना दिसत आहेत. हेच पाणी आपल्या घरात येतं आणि आपण पितो. त्यामुळे याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हे अतिशय गंभीर असून आरोग्याला असलेला धोका अधोरेखित करत सोसायट्या सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी त्वरित दुरुस्ती आणि साफसफाईची मागणी करत आहेत. पुणे महानगरपालिका (PMC) स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे.शहरात महापालिकेकडून दररोज मोठया प्रमाणात स्वच्छता केली जाते. परंतु पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍या नागरिकांची संख्याही अधिक आहे.

पुणेकर अनेक गोष्टींमध्ये आघाडीवर असतात. त्यामुळे पुणे शहराची आणि पुणेकरांची चर्चा देशभर होत असते. पुणेकरांनी सुरुवात केलेल्या नावीन्यपूर्णतचे नेहमी इतरत्र कौतूक होत असते. परंतु आता पुणेकरांना विचार करावा लागणार आहे आणि अस्वच्छतेविरुद्ध मोहीम सुरु करावी लागेल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ thepunemirror नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “हा एकाप्रकारे लोकांच्या जीवाशी खेळ आहे” तर आणखी एकानं “याकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.