Shocking Video: सोशल मीडियावर अनेक जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. संघर्षाच्या जोरावर एक छोटा बेडूक भयंकर सापाच्या तोंडात जाऊनही निसटला, हे ऐकून विश्वास बसत नाही. पण, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही घटना घडलीय. बेडकाच्या या संघर्षाला लोक सकारात्मकतेने घेत आहेत.
जो हार मानत नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवतो, तो संघर्षाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या आव्हानांनाही तोंड देऊ शकतो. बेडकासारखा छोटा प्राणी आजकाल सोशल मीडियावर अनेकांना हे शिकवत आहे. एका भयंकर आणि अवाढव्य सापाने त्या बेडकाचा पाय तोंडात पकडून ठेवला होता, पण तो बेडूक हार न मानता स्वतःवर आलेल्या संकटाला तोंड देत राहिला आणि अखेर त्याच्या संघर्षाला यश आले आणि सापाला पराभवाचा सामना करावा लागला.
…अन् बेडकाने हार मानली नाही
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक साप बेडकाची शिकार करण्याच्या पूर्ण तयारीत दिसतोय. सापाने बेडकाचा पाय तोंडात घट्ट धरल्याचं दिसतंय. तो त्याची शिकार करण्याच्या संधीत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका गेटवर बेडूक चढताना दिसतोय, पण सापाने त्याचा पाय तोंडात पकडला आहे. बेडकाला सापापासून मुक्त होण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतायत. बेडूक हार मानणार असं वाटत असतानाच तो त्याच्या अथक प्रयत्नांनी वर वर चढत जातो आणि स्वत:ला सापाच्या तावडीतून सोडवतो. सापाच्या तावडीतून सुटताच बेडूक जोर जोरात उड्या मारून पळून जातो. हा ३४ सेकंदांचा व्हिडीओ दाखवतो की, बेडकाने शेवटच्या श्वासापर्यंत आपला जीव वाचवण्यासाठी शक्तिशाली सापाशी झुंज दिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mpsc_yoddha_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला सात लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
बेडकाचा आणि सापाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “शाब्बास पठ्ठ्या”, तर दुसऱ्याने “एकच नंबर” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “एकदम बरोबर.”