Two Sisters Died in Car: कोणाच्याही घरात लहान मुलं असली की कायम त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. कारण कधी कोणता वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. बाहेर असताना लहान मुलांची विशेष काळजी घेतली जाते, त्यांना लागू नये, ते मस्ती करता करता कुठे पडू नये यासाठी त्यांच्यामागे एक माणूस असतोच. अशा वेळेस अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांना दुखापत होते.
कुठेही अशा चिमुकल्यांना एकटं सोडणं म्हणजे एक धाकधूकच असते. अनेकदा लहान मुलंही पालकांचं न ऐकता अशा गोष्टी करतात, ज्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावतं. आणि मग यामुळेच भयंकर अपघातासारख्या गोष्टी घडतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्यात, पालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि एका चुकीमुळे दोन चिमुकल्यांचा जीव धोक्यात गेला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…
तेलंगणाच्या रंगा रेड्डी येथून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. सोमवारी जिल्ह्यात चार आणि पाच वर्षांच्या दोन मुली चुकून कारमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्युमुखी पडल्या. पोलिसांनी ही माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना दुपारी २ च्या सुमारास दमरगिड्डा गावात घडली जेव्हा दोन्ही बहिणी खेळत असताना त्यांच्या एका नातेवाईकाच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये बसल्या होत्या. प्राथमिक माहितीच्या आधारे, पोलिसांनी सांगितले की मुलींना गाडीत बंद केल्याची माहिती त्यांच्या पालकांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना नव्हती.
बहिणी कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या
चेवेल्ला पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे ३०-४५ मिनिटांनंतर त्यांना मुली कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या आणि त्यांना ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या मुली त्यांच्या पालकांसोबत दामरगिड्डा येथील त्यांच्या नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस रुग्णालयात पोहोचले तेव्हा पालक मृतदेह घेऊन त्यांच्या गावी गेले होते. या घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.