Women Consuming Drugs Video: गेल्या अनेक वर्षात ड्रग्स घेणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. मद्यपान, धुम्रपानाबरोबरच आता ड्रग्जची सवयदेखील अनेकांना लागली आहे. आणि यासाठी मग ती माणसं काहीही करतात. अनेकदा सोशल मीडियावर यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन महिला दिवसाढवळ्या रिक्षेत ड्रग्जचे सेवन करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये पुढे परिसरात त्यांना ड्रग्ज कसे आणि कुठून मिळाले याबद्दल चर्चा दाखवली आहे. संभाषणादरम्यान व्यसनींनी औषधांची किंमत देखील सांगितली. हा व्हिडिओ मुंबईतील मालाडमधील मालवणी परिसरात चित्रित केल्याचा दावा केला जात आहे.
महिला ड्रग्ज घेताना व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन महिला ड्रग्जचे सेवन करत असल्याचे दिसून येत आहे, त्यांच्यासोबत रिक्षेत एक पुरूषही आहे. क्लिप रेकॉर्ड करणारा माणूस, कदाचित सीक्रेटली रेकॉर्ड करत होता. त्यांच्याशी बोलताना आणि ड्रग्जमुळे त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल तो त्यांना सल्ला देताना दिसतोय.
व्हिडीओमध्ये असं दिसून येतंय की, त्या महिला त्याला सांगत आहेत की त्यांना खूप व्यसन लागले आहे आणि त्या ड्रग्ज घेतल्याशिवाय राहू शकत नाहीत. मग तो माणूस ते ड्रग्स त्यांना ते कुठे सापडले त्याचं ठिकाण आणि दर विचारतो. महिला त्याला दोन पाउचसाठी २०० रुपयांचा दर आहे असं सांगताना व्हिडीओमध्ये दिसून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @aasif_o या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “वडा पाव घेण्यापेक्षा ड्रग्स विकणे आणि सेवन करणे सोपे आहे आणि मुंबईत वडा पावची किंमत जवळजवळ सारखीच आहे. तुम्ही कशाची निवड कराल?” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच कॅप्शनमध्ये “मालवणी गेट क्रमांक ०६” असंही स्थान दिलं आहे.
तसंच या व्हिडीओमध्ये त्याने मुंबई पोलिस, सीएमओ महाराष्ट्र, एनसीबी इंडिया आणि त्या भागाचे स्थानिक प्रतिनिधी असलेले काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना टॅग केले.
व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया
मुंबई पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आल्याचे सांगितले. व्हिडिओ पोस्टवरील कमेंटमध्ये, मुंबई पोलिसांच्या ऑफिशियल अकाउंटवरून कमेंट करत उत्तर दिले की, “आम्ही मालवणी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे.”
© IE Online Media Services (P) Ltd