Woman working on laptop while driving a car: ऑफिसचं काम कधीच संपत नाही असं अनेकदा आपण कित्येकांकडून ऐकत असतो. म्हणूनच अनेकदा घरी जाताना ट्रेनमध्ये, कारमध्ये जिथे वेळ मिळेल तिथे उरलेलं काम करताना आपण अनेकांना पाहिलंच असेल. तसंच अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांना ऑनलाइन मिटींग अटेंड करतानादेखील आपण पाहिले असेल. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात बेंगळुरूतील एक महिला ट्रॅफिकमधून गाडी चालवता चालवता लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी अशा धोकादायक वर्तनाविरुद्ध कडक इशारा दिला आहे.

कार चालवताना करतेय काम

एक्सवर, बेंगळुरूच्या वाहतूक उत्तर येथील पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक महिला कार चालवताना दिसतेय. पण, कार चालवताना स्टीअरिंग व्हीलवर तिने तिचा लॅपटॉप ठेवला आहे आणि त्यावर काम करत ती गाडी चालवताना दिसतेय.

महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच आणि गाडीची नंबर प्लेट स्पष्ट दिसत असल्याने, अधिकाऱ्यांनी तिचा माग काढला आणि बेपर्वा गाडी चालवल्याबद्दल तिला १,००० रुपये दंड ठोठावला. जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, ती बीटीएम लेआउटमध्ये एका खाजगी कंपनीत काम करते आणि तिला वेळेवर लॉग इन करावे लागते. प्रवास लांबचा असल्याने, तिने त्या वेळेत काम करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @DCPTrNorthBCP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “वर्क फ्रॉम होम आहे, ते गाडी चालवताना वर्क फ्रॉम कार नाही,” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “गाडीतून तिला काम करायला लावणाऱ्या व्यक्तीला अटक का करू नये?”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “चालकाला किमान एक वर्ष तुरुंगात टाका किंवा परवाना रद्द/निलंबित करा.” तर एकाने “तिचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करावे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “जेव्हा अनियोजित विकासामुळे मुख्य रस्त्यांमध्येच पार्किंग केली जाते तेव्हा लोकांकडे ऑफिसला जाण्यास उशीर होतो, त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नसतो.” तर “अगं जीव महत्त्वाचा की ऑफिसचं काम” अशीदेखील कमेंट एकाने केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of woman using laptop while driving a car in bengaluru viral video on social media dvr