७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली. या वीकदरम्यान प्रेमी युगुल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट्स, फुले आणि अनेक गिफ्ट्स देतात आणि हा आठवडा साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीकमधला नुकताच प्रपोज डे पार पडला आणि या दिवशी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एका तरुणीबरोबर संतापजनक घटना घडली, ज्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या धक्कादायक घटनेत व्हिडीओमध्ये एक तरुण व्हॅलेंटाईन वीकदरम्यान एका मुलीवर मिठाई फेकून तिच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे. तरुणाच्या या क्रूर कृत्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे आणि लोक आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे रोजी घडल्याचे वृत्त आहे.
तरुणाचं धक्कादायक कृत्य
व्हिडीओमध्ये दिसतंय की, एका तरुणाने एका तरुणीला प्रपोज केलं आणि नंतर तिने त्याचे प्रपोजल नाकारले म्हणून एका बॉक्समधून मिठाई काढली आणि तिच्यावर फेकायला सुरुवात केली. त्याने मिठाईचा डबाही तिच्यावर फेकला. आरोपीसोबत त्याचे मित्रही होते. तसंच तो तरुण मुलीच्या डोक्यावर मारतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे, तर त्याचा मित्र निष्पाप मुलीसोबतच्या या गैरवर्तनाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना दिसतोय. व्हिडीओतून असंही लक्षात येतंय की, आरोपी तरुण आणि त्याचे मित्र एका गाडीतून घटनास्थळावरून निघून गेले आणि मुलगी जागीच उभी राहून अश्रू ढाळत होती. आरोपीने घटनेचे रेकॉर्डिंग केले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @TrueStoryUP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील गजरौला येथे एका तरुणाने एका मुलीला सार्वजनिक ठिकाणी प्रपोज केल्यावर तिने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवली,” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
ही घटना व्हॅलेंटाईन वीकदरम्यान घडली, ज्या वेळी बरेच लोक प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. ही घटना अमरोहाच्या गजरौला पोलिस ठाणे परिसरात घडली. दुर्दैवाने, अशा घटना समाजात महिलांच्या सुरक्षिततेची आणि आदराची गरज अधोरेखित करतात. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
इंटरनेट युजर्स आणि स्थानिक लोक आरोपींवर कडक शिक्षा आणि जलद कारवाईची मागणी करत आहेत, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
पोलिसांनी सांगितले की, “या प्रकरणात गजरौला पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांना कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”