Young Man Molested a School Girl in Bus: वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुले फिरतायत. यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी घाबरून शांत बसतात.

सध्या अशीच एक घटना एका बसमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका शाळेतील विद्यार्थीनीची एक तरुण छेड काढताना दिसतोय. पुढे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…

सगळ्यांसमोर काढली तिची छेड

शाळेतील मुलीबरोबर तरुणाच्या विकृत कृत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, प्रवाशांनी भरलेल्या एका बसमध्ये एक तरुण शाळेतील विद्यार्थीनीची छेड काढतोय. बसमध्ये बसायला जागा नसल्याने शाळेच्या गणवेशात असलेली एक मुलगी उभी आहे. आणि तिच्या बाजूला उभं राहून एक तरुण मुद्दाम तिची छेड काढताना दिसतोय. मुद्दाम तिला धक्का देत तिला स्पर्श करताना दिसतोय. हे कृत्य तो निर्लज्जासारखं सगळ्यांच्या समोर अगदी उघडपणाने करतोय.

त्याच्या या विकृत कृत्यावर आवाज उठवण्यासाठी एक प्रवासी त्याला जाब विचारतो यावरदेखील माज दाखवत तो विकृत तरुण त्याच्याशी भांडू लागतो. शेवटी एक महिलादेखील तरुणाला जाब विचारते. शेवटी बस थांबवून त्या तरुणाला उतरवलं जातं. व्हिडीओच्या अखेरीस तो माफी मागतानादेखील दिसत आहे. यादरम्यान, ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली हे अद्याप कळू शकलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @bongsurajj_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ९. २ मिलियन व्ह्युज आले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा लोकांमुळेच मुली असुरक्षित आहेत” तर दुसऱ्याने “त्याला तुरुंगवास व्हायला हवा” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “मुलींनी स्वतःसाठी आवाज उठवायला हवा”