Chhaava Movi Shocking Video : विकी कौशलच्या छावा या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. सर्व थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले दिसतायत. चित्रपटातील डायलॉग्स आणि सीन्स अंगावर शहारे आणणारे आहेत. चाहते विकीचं प्रचंड कौतुक करतायत. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलंय. दरम्यान, एका थिएटरमध्ये हा चित्रपट सुरू असताना घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तसेच व्हिडीओत दिसणाऱ्या प्रेक्षकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील गणेश थिएटरमधील हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओत काही लोक थिएटरमध्ये छावा हा चित्रपट सुरू असताना आरामात मद्य प्राशन करताना दिसतायत. यावेळी त्यांना एका प्रेक्षकाने त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करीत जाब विचारला, ज्यावर त्याला उत्तर देण्यात आले की, मी काय आवाज करतोय का? पण एका महापुरुषाचा चित्रपट समोर सुरू असताना अशा प्रकारचं धक्कादायक कृत्य करणं कितपट योग्य आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तसेच थिएटरमध्ये मद्याची बाटली नेण्यास परवानगी मिळाली कशी असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका थिएटरमध्ये छावा हा चित्रपट सुरू आहे. यावेळी थिएटरच्या अगदी मागच्या बाजूच्या आसनांवर काही लोक बीअरची बाटली आणि बाजूला पाणी अन् चण्याचे पॅकेट ठेवून आरामात मद्य प्राशन करतायत. यावेळी त्यांच्या पुढच्या आसनांवरील काही प्रेक्षकांनी त्यांना मागे वळून काय प्रकार सुरू आहे, असा प्रश्न केला. यावेळी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीने मी काय आवाज करतोय का, गोंधळ घातलोय का, असे उत्तर दिले. त्यावर इतर प्रेक्षकांनी मद्य प्राशन करणाऱ्यांना तुमचा सुरू असलेला प्रकार बंद करा, असे त्यांना बजावले.

थिएटरमधील हा व्हिडीओ @kartik_salunkhe_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यातील काही प्रेक्षकांचं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काहींनी लिहिले की, असं कृत्य करताना ह्यांना लाजा कशा वाटत नाहीत. अनेकांनी त्याच मद्याच्या बाटल्या त्यांच्या डोक्यात घातल्या पाहिजे होत्या, असे म्हणत संताप व्यक्त केलाय. तर काहींनी, लोकांना कुठे काय वागलं पाहिजे याचं भानच राहिलेलं नाही, असे म्हटले आहे.

Story img Loader