Crime news pune: सोशल मीडियावर अनेकदा भांडणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी सासू-सुनेचं भांडण तर कधी ट्रेनमध्ये भांडण, कधी विरुद्ध दिशेने गाडी टाकली किंवा ओव्हरटेक केली तर रस्त्यावर होणारी वाहनचालकांची भांडणं आपण अनेकदा पाहतो. या भांडणांचं रुपांतर अनेकदा मारामारीतदेखील होतं आणि परिस्थिती बिकट होते. मागील काही वर्षात देशातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. गावगुंड, चौकातील गुंडांनी कहर केल्याचं दिसतंय. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. अशातच आता पुण्यात एक प्रकार समोर आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ३ तरूणांनी भर रस्त्यात केलेल्या गुंडागर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बहुतेकवेळा भांडणांमध्ये काही जण आपली मर्यादादेखील ओलांडतात, समोरच्याला नको तो बोलतात आणि मनमर्जी चालवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये तरुणांनी एका कारचालकाला शिवीगाळ करत पाठलाग करुन धमक्या दिल्या आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कारचालक रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन जात असताना स्कूटीवर असलेल्या तीन तरुणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच अशी का गाडी चालवतो आहेस असा प्रश्न करत गाडी अडवल्याचं दिसत आहे. यावर कारचालक अतिशय नम्रपणे सांगताना दिसत आहे की, मी काहीच केलं नाही. यावरही हे तरुण कारचालकाला शिवीगाळ करत आहेत. अशाप्रकारे लोकांना विनाकारण त्रास देणे आणि धमक्या देणे गंभीर होत चाललं आहे.
पाहा व्हिडीओ
गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे, पोलिस आणि प्रशासन या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.