Flight Shocking Video Viral : विमानात प्रवास करताना धुम्रपान करण्यास अर्थात सिगारेट ओढण्यास मनाई आहे. याबाबत प्रवाशांना विमान प्रवासापूर्वी सूचनाही दिल्या जातात. मात्र, तरीही काही प्रवासी हे नियम मोडताना दिसतात. अशा प्रकारे एक महिला विमानात सिगारेट ओढताना दिसली. महिलेच्या या कृतीने प्रवासी आणि विमान कर्मचारदेखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी लगेच तिला सिगारेट विझवण्यास सांगितले. पण त्यावर महिला संतापली आणि तिनं असं काही केलं की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सिगारेट काढून घेताच महिला संतापली अन्….

महिलेला विमानातील स्टाफने सिगारेट विझवण्यास सांगितले. पण तरीही तिनं कोणाचं न ऐकता सिगारेट ओढणं सुरू ठेवलं. त्यानंतर फ्लाइटमधील स्टाफनं कशीतरी तिच्या हातातील सिगारेट ओढून घेतली. हे पाहून ती महिला खूप संतापली आणि तिनं खिशातून लायटर काढून संपूर्ण विमान पेटवण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओ हा इस्तंबूलहून सायप्रसला जाणाऱ्या विमानातील असल्याचं सांगितलं जातेय.

व्हिडीओत पाहू शकता की, एक महिला सर्व नियम धाब्यावर बसवीत आरामात सिगारेट ओढताना दिसतेय. महिलेच्या या धक्कादायक कृत्यामुळे विमानात आगीची घटना घडली असती. मात्र, विमानातील स्टाफनं तातडीनं महिलेला सिगारेट ओढण्यापासून रोखलं. व्हिडीओ फुटेजमध्ये दिसून येतेय की, फ्लाइट क्रू मेंबर्स महिलेकडून सिगारेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यावर पाणी ओतण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून सिगारेट विझेल. स्टाफने दाखवलेल्या सतर्कतेमुळे भयानक परिस्थिती टाळता आली.

हा धक्कादायक व्हिडीओ @malikalitv नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “इस्तंबूलहून सायप्रसला जाणाऱ्या विमानातील एका प्रवाशाने विमानाला आग लावण्याचा प्रयत्न केला.” अनेकांनी या महिलेवर कडक कारवाईची मागणी केली आहे. तर अनेकांनी प्रवाशाच्या निष्काळजी वर्तनाचा निषेध केला आहे. एका युजरनं कमेंट केली की, आता या महिला प्रवाशाच्या कृत्यानं अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. त्यामुळे तिला दहशतवादी म्हणून घोषित करा. दुसऱ्यानं लिहिलं की, आता तिला पुन्हा कधीही विमान प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.