Shocking Viral Video : हल्ली सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक मर्यादा ओलांडताना दिसतात. काही लाइक्स, शेअर्स आणि व्ह्यूजसाठी लोकं जीव धोक्यात घालताना दिसतात. अनेकदा धावत्या ट्रेनसमोर काही जण रील्स बनवताना दिसतात. अनेकदा या रील्समध्ये लोक असे काही भयानक गोष्टी करताना दिसतात की पाहून काळजात धडकी भरते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण रेल्वे रुळावर झोपून रील बनवताना दिसतोय. याचदरम्यान संपूर्ण ट्रेन त्याच्या शरीरावरून गेली, त्यानंतर पुढे काय घडलं पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील कुसुंभी रेल्वेस्थानकादरम्यानची ही घटना आहे. यात रणजित चौरसिया नावाचा एक तरुण रेल्वे ट्रॅकवर झोपून व्हिडीओ शूट करत आहे आणि त्याने तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओत तो शाहरुख खानच्या ‘बादशाह’ चित्रपटातील एका गाण्यावर रील शूट करत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जीआरपीने संबंधितास तात्काळ कारवाई करत अटक केली आहे.

तरुण ट्रॅकच्या मधोमध पडून होता; पण…

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रेल्वे ट्रॅकच्या मधोमध झोपला आहे. हातात मोबाईल कॅमेरा ऑन करून तो यावेळी व्हिडीओ शूट करतोय. याचदरम्यान थोड्या वेळाने एक भरधाव ट्रेन त्या रुळांवरून गेली. ट्रेन खूप वेगात असल्याने ती काही सेकंदांत रुळांवरून पुढे गेली. यावेळी तो तरुण ट्रॅकच्या मधोमध पडून होता; पण ट्रेन जाताच तरुण हसत हसत मोबाईल घेऊन ट्रॅकवरून उठला.

या प्रकरणावर जीआरपीचे निरीक्षक अरविंद पांडे यांनी सांगितले की, संबंधित व्हायरल व्हिडीओतील आरोपी तरुणाविरुद्ध रेल्वे ट्रॅकमध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. भविष्यात जर कोणी रेल्वे ट्रॅकमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

तसेच सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुणांनी अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालू नये, अन्यथा याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.