Spicy Food Trending News: आपल्यापैकी अनेकांना तिखट खाण्याची आवड असते. अगदी नाकातून डोळ्यातून पाणी आलं तरी काहीजण ‘और तिखा’ असा हट्ट धरून बसतात. पाणीपुरी वाल्याकडे हाशहुश करून खाणारी मंडळी तर आपणही पाहिली असतील. तिखट खाण्याबाबत अनेक तज्ज्ञांची अनेक मते आहेत. काहींच्या मते तिखट पदार्थ हे तुमच्या शरीराचा मेटाबॉलिज्म वाढवून पचनप्रक्रियेत मदत करू शकतात. तर काहींच्या मते अति तिखट खाल्ल्याने ऍसिडिटी, अपचन व मूळव्याध अशा समस्या वाढू शकतात. या सगळ्या वादविवादात एक गोष्ट तर स्पष्ट आहे की तिखट खाल्ल्याने होणारा परिणाम हा तुमच्या पोटावर व फार फार तर आतड्यांवर होऊ शकतो. पण अलीकडेच समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारात तिखट खाल्ल्याने एका महिलेच्या ४ बरगड्या तुटल्याचे समजत आहे.
चीनमधील हुआंग नावाच्या एका महिलेच्याबाबत हा प्रकार घडला आहे. तिखट खाणं या महिलेला आता चांगलंच महागात पडल्याचं समजतंय. प्राप्त माहितीनुसार हुआंग हिला तिखट खाताना ठसका लागला होता. खाऊन झाल्यारही बराच वेळ ही महिला खोकतच होती. यावेळी तिला मध्येच काहीतरी तुटल्याचा आवाज आला होता. पण अर्थात अंदाज न आल्याने तिने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. काहीवेळाने हुआंगला होणारा त्रास आणखीनच वाढू लागला, तिला श्वास घ्यायला व साधं बोलायलाही त्रास होत होता.
हुआंगने अखेरीस डॉक्टरांची भेट घेताच त्यांनी तिला सिटीस्कॅन करण्यास सांगितले, ज्यात हुआंगच्या छातीतील ४ बरगड्या तुटल्याचं डॉक्टरांना लक्षात आलं. सध्यातरी डॉक्टरांनी बँडेजच्या मदतीने तिच्या बरगड्या बांधून तिला एक महिना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. हुआंगचे वजन अवघे ५७ किलो आहे त्यामुळेच थोड्याश्या खोकल्याने तिच्या हाडांना तडा गेला असावा असा डॉक्टरांचा अंदाज आहे.
हे ही वाचा<< हेल्मेट न घालता तरुणाचा पोलिसांसमोर आगाऊपणा; पण पोलिसांचं ‘हे’ उत्तर बघून नेटकरी जास्त भडकले, पाहा
डॉक्टरांनी सांगितले की, हुआंग अत्यंत बारीक असल्याने तिच्या शरीरात हाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्नायूंचा अभाव आहे. परिणामी अगदी सहन हाडांना क्रॅक जाऊ शकतो. या घटनेनंतर हुआंगने सुद्धा आपण वजन वाढण्यासाठीच नव्हे तर सुदृढ राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करणार असल्याचे म्हंटले आहे.