गाजावाजा करत बाजारात आणलेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ फोनमुळे सॅमसंग कंपनीची जगभरात चांगलीच नाचक्की झाली आहे. सदोष बॅटरीमुळे या कंपनीने नोट ७ चे उत्पादनही थांबवले आहे. या फोनच्या बॅटरीचा स्फोट होण्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशातच बॅटरीचा स्फोट होतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला तिच्या नोट ७ ला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
दक्षिण कोरियातील एका फास्ट फूड हॉटेलमधील हा व्हिडिओ आहे. या हॉटेलमधील एका महिला कर्मचा-याच्या फोनने अचानक पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी या महिलेने आपल्या हाताने आग विझवण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नात तिच्या हातून फोन खाली पडला. हॉटेलमध्ये त्याचा स्फोट होऊ नये यासाठी ती मोबाईल कसा बसा घेऊन बाहेर जाते. हॉटेलमध्ये असणा-या एका ग्राहकाने हा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सॅमसंगच्या नोट ७ मध्ये स्फोट होण्याचा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सॅमसंगने जगभरातून हे फोन परत मागवले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करून सॅमसंग फोनची तक्रार केली होती. कोरियाच्या हॉटेलमध्ये काढलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Story img Loader