जगातील सर्वात उंच व्यक्ती व सर्वात बुटका व्यक्ती यांची भेट होणे हे दुर्मीळ आहे. पण, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात उंच आणि सर्वात बुटक्या व्यक्तीची एकाचवेळी भेट घडवून दिली आहे. त्यांच्या भेटीचा हा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे. यात जगातील सर्वात उंच व्यक्ती सुलतान कोसेन आणि सर्वात लहान व्यक्ती चंद्र बहादूर डांगी एकाचवेळी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ जुना आहे, पण पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
तुर्कीमध्ये राहणारा जगातील सर्वात उंच व्यक्ती सुलतान कोसने याने १० डिसेंबर रोजी त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा केला. सुलतान कोसने याची उंची ८ फूट ३ इंच आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जगातील सर्वात बुटक्या व्यक्तीला भेटताना दिसत आहे. २००९ पासून जगातील सर्वात उंच व्यक्ती होण्याचा विक्रम सुलतानच्या नावावर आहे.
तर नेपाळचे चंद्र बहादूर डांगी यांना जगातील सर्वात बुटक्या व्यक्तीचा किताब मिळाला आहे, जो ५५ सेंटीमीटर म्हणजेच १ फूट ८ इंच उंच आहे. त्याचे वजन फक्त १४ किलो होते. २०१४ मध्ये लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील त्यांच्या भेटीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, जगातील सर्वात उंच व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… २०१४ मध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे’ निमित्त ८ फूट २.८ इंच उंचीच्या सुलतानची भेट आजपर्यंतच्या जगातील सर्वात बुटका व्यक्ती चंद्र बहादूर डांगी यांच्याशी झाली. त्याच्यासोबत GWR एडिटर-इन-चीफ क्रेग ग्लेन्डे सामील झाले. या व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र फिरताना आणि हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
जगातील सर्वात उंच माणूस व्यवसायाने शेतकरी
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, व्यवसायाने शेतकरी असलेल्या सुलतानची उंची बास्केटबॉल हूपएवढी आहे. यासोबतच जगातील सर्वात लांब हात असलेल्या व्यक्तीचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याच्या तळहाताची आणि बोटांची लांबी सुमारे ११.२ इंच आहे. म्हणजे एका फुटापेक्षा काही सेंटीमीटर कमी. pituitary gigantism नावाच्या वैद्यकीय स्थितीमुळे सुलतान असामान्यपणे उंच वाढला. यापूर्वी हा विक्रम चीनच्या शी शूनच्या नावावर होता, ज्यांची उंची सुमारे ७ फूट ९ इंच होती.
चंद्र बहादूर यांच्या नावावरही दोन गिनीज रेकॉर्ड
तर गिनीजकडून चंद्र बहादूर डांगी यांना दोन सर्टिफिकेट देण्यात आली आहेत; पहिले जगातील सर्वात लहान प्रौढ व्यक्ती म्हणून आणि दुसरे गिनीजच्या ५७ वर्षांच्या इतिहासातील सर्वात लहान व्यक्ती म्हणून. चंद्र बहादूर हे बौनेत्वाच्या विकाराने त्रस्त होते. नेपाळची राजधानी काठमांडूपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रिमखोली गावात डांगी आपल्या कुटुंबासह राहत होते, पण २०१५ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.