Navratri Shrikant Shinde Dandiya: देशभरात नवरात्रीची धामधूम सुरु आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी रास गरबा व दांडियाची आयोजन केले आहे. बोरिवलीत आमदार प्रवीण दरेकर तर डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या स्तरावर गरबा- दांडियाची आयोजन केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रास रंग या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवण्यासाठी अनेक फिल्मी सेलिब्रिटीही हजेरी लावत आहेत. अलीकडेच स्वतः बॉलिवूडचे भिडू जॅकी श्रॉफही शिंदेच्या गरब्यासाठी डोंबिवली नगरीत आले होते. उत्साहाचा खजिना म्हणून ओळखले जाणारे जॅकी श्रॉफ डोंबिवलीकरांसह बेभान होऊन नवरात्रीच्या उत्साहात रंगलेले दिसून आले.
जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ स्वतः श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. या रास रंग कार्यक्रमात मीडियाशी बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, “डोंबिवलीकरांचा उत्साह कमाल आहे, मला असं वाटतं मी इथे पुन्हा पुन्हा यायला हवं.” तसेच डोंबिवली तसं प्रवासाच्या दृष्टीने थोडं लांब होतं, मी थोडा रस्ता चुकलो पण पुढच्यावेळी येताना रस्त्यावर लक्ष ठेवून येईन असेही जॅकी श्रॉफ म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की यात जॅकी श्रॉफ जोशात ढोल वाजवताना दिसत आहेत. जॅकी यांना साथ देत श्रीकांत शिंदेही बेभान होऊन बॅंजो वाजवताना दिसत आहेत. या दोघांच्या तालावर डोंबिवलीकर नाचून साथ देत आहेत.
श्रीकांत शिंदेच्या गरब्याला आले जॅकी श्रॉफ
दरम्यान, नवरात्रीत शेवटचे दोन दिवस अनेक ठिकाणी रात्री १२ वाजेपर्यंत गरबा व दांडियाला परवानगी देण्यात आली आहे. दोन वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर यंदा भाविक अंबेमातेच्या या सोहळ्यात मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.