१७ वर्षांच्या मुलानं अशी एक चप्पल बनवली आहे जी महिलांचा बॉडीगार्ड म्हणून काम करू शकेल. रोडरोमियोंना धडा शिकवण्यासाठी चप्पलचा मार पुरेसा आहे म्हणा! पण ही चप्पल फार वेगळी आहे. हिच्या एका रट्ट्याने रोडरोमियोंसमोर दिवसा काजवे चमकतील हे नक्की. हैदराबादमध्ये राहणाऱ्या १७ वर्षांच्या सिद्धार्थने ‘इलेक्ट्रोशूज’ नावाची चप्पल तयार केली आहे. या चप्पलचा रट्टा पडताच समोरच्या व्यक्तीला विजेचा तीव्र झटका बसतो. त्यामुळे महिला या चप्पलच्या साह्याने आपलं रक्षण करू शकतात.
दिल्लीच्या निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. छोटा सिद्धार्थ आपल्या आईसोबत या घटनेचा निषेध करण्यासाठी एका मोर्चात सहभागी झाला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी एखादी वस्तू तयार करण्याची कल्पना सिद्धार्थला त्यावेळीच सुचली. त्याने अनेक वर्षे यावर काम केलं आणि त्याच्या मेहनतीतून ही चप्पल तयार झाली. विशिष्ट तंत्र वापरून ही चप्पल तयार करण्यात आली आहे. ही चप्पल चार्ज करण्याचीही गरज नाही. जितक्यावेळ ती पायात असेल तितकी ती चार्ज होत राहिल. महिलेवर समजा एखाद्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर या चप्पलचा वापर करून ती आपले रक्षण करू शकते. सध्या सिद्धार्थ यावर आणखी काम करतो आहे. ही चप्पल स्वस्तात उपलब्ध व्हावी, या प्रयत्नात तो आहे.