दिवाळीला अवघे दोन आठवडे उरले आहे. भारतीय बाजारपेठा कंदील, दिवे, कपडे, फटाके यांनी फुलून गेल्या आहेत. कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवाराला एकत्र आणणा-या रोषणाईच्या सणांचे अप्रुप परदेशातील अनेक लोकांना असते म्हणूनच सिंगापूरमध्ये खास दिवळानिमित्त दिवाळी रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.
सिंगापूरमधली ही पहिली दिवाळी थिम ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या, दिवे, तोरण, शुभ शकुनांचे स्टिकर्स चिटकवण्यात आले आहे. भारतात दिवाळी सणाच्या काळात जसा माहोल असतो तसाच या ट्रेनमध्ये प्रवाशांना पाहायला मिळणार आहे. १५ ऑक्टोबरला या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. मास रॅपीड ट्रान्झीटने सिंगापूरमधल्या या पहिल्या वहिल्या दिवाळी ट्रेनचे अनावरण केले. तर इथल्या रस्ते वाहतूक विभागाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सजवलेल्या ट्रेनचे फोटो देखील शेअर केले आहेत. प्रत्येक ट्रेनच्या कोचमध्ये दिवाळीचा शुभेच्छा देणारे संदेश देखील लावण्यात आले आहेत.
या दिवाळी ट्रेनची कल्पना सिंगापूरमधल्या छोटा भारत ठिकाणातून सुचली आहे. सिंगापूरमधल्या छोटा भारत म्हणजेच लिटल इंडियात भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इथूनच प्रेरणा घेतल्याचे मास रॅपीड ट्रान्झीटने सांगितले . इतकेच नाही तर लिटल इंडिया या स्टेशनवर जाणा-या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे फ्लॅटफॉर्म देखील दिवाळी थिमने सजवले आहेत. ठिकठिकाणी दिवे, पणत्या, तोरण, कमळ यांचे स्टीकर्स लावले आहेत. लिटल इंडियामधल्या रस्तो रस्ती देखील अशाच प्रकारचे कंदील, तोरणे लावण्यात आले आहेत.
सिंगापूरमधल्या भारतीयांना येथल्या दिवाळीची कमतरता भासू नये तसेच तिथल्या स्थानिकांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा एमआरटीच्या प्रयत्नांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.