महाराष्ट्रात भक्तीगीतांची एक मोठी परंपरा पाहायला मिळते. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांसह अनेक संतांची महती सांगणारी ही भक्तीगीतं केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील वारकरी सांप्रदाय तितक्याच आवडीने ऐकतो. इतकचं नाही, विदेशी नागरिकांनाही आता या भक्तीगीतांची ओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठात सार्वजनिक उपासनेचा एक भाग म्हणून स्टॅनफोर्ड मेमोरियल चर्चमध्ये प्रसिद्ध गायिका जाहन्वी हैरिसन ‘सुंदर ते ध्यान’ हे भक्तीगीत गाताना दिसत आहे.

अतिशय आनंदमय आणि भक्तीमय वातावरणात चर्चमधील अनुयायी सुंदर भक्तीगीताचा आनंद घेताना दिसत आहेत. या सुंदर क्षणाचा एक व्हिडीओ प्रसिद्ध गायिका जाहन्वी हैरिसनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चर्चमध्ये माइकसमोर उभी राहून गायिका जाहन्वी हैरिसन सुरात ‘सुंदर ते ध्यान’ हे भक्तीगीत गात आहे. यावेळी तिला गाण्यासाठी हार्मोनियम आणि ढोलकीची साथ देण्यात आली. विशेष म्हणजे एक परदेशी महिला हार्मोनियम वाजवताना दिसत आहे.

जाहन्वी हैरिसनने भक्तीगीत गातानाचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, माझे पती @kennethnacariolee यांनी भागवत पुराणातील ध्रुवाच्या कथेवर तसेच चिंतन आणि ध्यानाद्वारे प्रेम या विषयावर एक सुंदर उपदेश दिला. आम्हाला @ganavya आणि @rajna_music च्या उपस्थितीने खूप आनंद झाला आहे. असे वाटले की, आम्ही आणखी बरेच तास हा कार्यक्रम चालू ठेवू शकलो असतो. तुम्ही नॉर्दर्न कॅलिफोर्निया परिसरात असाल आणि भविष्यात यासारख्या इव्हेंटमध्ये येण्यास इच्छुक असल्यास @stanfordorsl यांना फॉलो करा, मी यासंदर्भात लवकरच पोस्ट करेन. अशाप्रकारची पोस्ट जान्हवी हैरिसनने केली आहे.

सोशल मीडियावरील युजर्सना तिचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. अनेकांनी त्यावर सुंदर, अप्रतिम अशाप्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत.