कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही, असं म्हणतात, सध्या असंच एक उदाहरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका व्यक्ती रातोरात लखपती बनला आहे. शिवाय आता इथून पुढे या व्यक्तीला काहीही काम न करता महिन्याला लाखो रुपये मिळणार आहेत. हो कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे. पण अशी घटना खरोखर घडली असून, सध्या तिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत पालटले आहे. शिवाय या व्यक्तीने असे बक्षीस जिंकले आहे, ज्यामुळे केवळ तामिळनाडूमधीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कारण मंगेश कुमार नटराजन नावाच्या व्यक्तीने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये गेल्यावर लॉटरी खेळली आणि त्यांनी ती लॉटरी जिंकली. शिवाय ही लॉटरी जिंकणारा ते UAE बाहेरील पहिला व्यक्ती ठरला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता नटराजन यांना पुढील २५ वर्षे दर महिन्याला प्रत्येकी ५.६ लाख रुपये मिळणार आहेत.
हेही पाहा- मुंबई लोकलचा एवढा कायापालट? कल्याणपर्यंत ‘ही’ सुपर फास्ट ट्रेन धावणार का? बघून तुम्हीही व्हाल लोटपोट
नटराजन हे भारतीय प्रकल्प व्यवस्थापक आहेत. ते २०१९ मध्ये कामासाठी UAE ला गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ते यूएईमध्येच असताना त्यांनी एमिरेट्स ड्रॉच्या FAST5 ग्रँड प्राइज नावाचा गेम खेळळा. जो त्यांनी जिंकला असून त्यांना आता दरमहा ५.६ लाख रुपये मिळणार आहे. नटराजन हे तामिळनाडूतील अंबुरचे रहिवासी आहेत. ते म्हणाले की, इतक्या मोठ्या रक्कमेचे पारितोषिक जिंकल्यावर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. मात्र जेव्हा त्यांना एमिरेट्स ड्रॉ वरून कॉल आला, तेव्हा मी खरोखरच बक्षीस जिंकल्याची मला खात्री पटली.
पीटीआयशी बोलताना नटराजन म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात आणि अभ्यासादरम्यान अनेक आव्हाने पाहिली आहेत. माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेक लोकांनी मला मदत केली आहे. आता या लोकांना आणि समाजाला मी काहीतरी देण्याची वेळ आली आहे. तसेच समाजातील गरजू लोकांना माझ्याकडून मदत होईल याची मी काळजी घेणार आहे.” नटराजन पुढे म्हणाले की, समाजासाठी योगदान देण्यासोबतच माझ्या दोन मुलींच्या शिक्षणासाठीही मी गुंतवणूक करणार आहे. हे बक्षीस जिंकणे माझ्यासाठी एक अविश्वसनीय क्षण होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण बनला आहे. मी माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचंही नटराजन म्हणाले.