L&T Chairman Salary : लार्सन अँड टुब्रोच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांनी रविवारसह आठवड्यातून ९० तास काम करावे असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. त्यांच्या या सल्ल्यावर उद्योगती हर्ष गोयंक, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॅटमिंटन ज्वाला गुट्टानेही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करण्याचा सल्ला देणारे लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे वार्षिक वेतन समोर आले आहे. २०२३-२४ या वर्षात त्यांना एकूण ५१ कोटी रुपये वेतन म्हणून मिळाले आहेत. जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा ५०० पट अधिक आहेत.
एसएन सुब्रह्मण्यम यांना २०२३-२४ मध्ये ५१ कोटी रुपये वेतन
अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या आर्थिक वर्ष २०२४ च्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना गेल्या आर्थिक वर्षात एकूण ५१ कोटी रुपये वेतन मिळाले आहे. हे वेतन मागील वर्षाच्या तुलनेत ४३.११ टक्के जास्त आहे. याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.
सामान्य कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन
कंपनीच्या आर्थिक अहवालात असेही दिसून आले आहे की, संचालक मंडळ आणि प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी वगळता कंपनीच्या इतर पुरुष कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन ९,७७,०९९ रुपये आहे. तर, महिला कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन ६,७६,८६७ रुपये इतके आहे. याचा अर्थ असा की, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रमुख कंपनीच्या अध्यक्षांचा पगार कंपनीतील सामान्य कर्मचाऱ्यापेक्षा सुमारे ५०० पट जास्त आहे.
काय म्हणाले होते एल अँड टी चे अध्यक्ष?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो कंपनी अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे.
याला उत्तर देताना ते म्हणाले, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.” ते पुढे म्हणाले की, “घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”
लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे रविवारसह आठवड्याला ९० तास काम करण्याचा सल्ला देणारे विधान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. यापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांच्यावरही जोरदार टीका झाली होती.