मेक्सिकोमध्ये विमान प्रवासादरम्यान चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मेक्सिकोमध्ये हवाई सेवा पुरविणारी एरोमेक्सिको ही व्यवसायिक क्षेत्रातील विमान कंपनी आहे. या कंपनीच्या विमानात प्रवासादरम्यान साप आढळल्याने प्रवाशांची चांगलीच पाचावर बसली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रसंग घडला तेव्हा विमान हवेत होते. एरोमेक्सिकोच्या विमानाने टोरेन येथून मेक्सिकोला जाण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र, विमान हवेत असताना प्रवाशांच्या डोक्यावर सामान ठेवण्यासाठी असलेल्या कप्प्याच्या भिंतीवर हिरव्या रंगाचा साप वळवळताना दिसला. या सापाला बघून प्रवाशांची चांगलीच पळापळ झाली. विमानातील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या सापाची लांबी जवळपास ३ फुट इतकी होती. सापाला बघितल्यानंतर प्रवाशांनी वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. त्यानंतर साप भिंतीवरून खाली पडला. त्यावेळी काही प्रवाशांनी ब्लँकेट टाकून सापाला पकडले. आमच्यासाठी हा प्रसंग खूप घाबरवणारा होता. मात्र, विमान हवेत असल्याने प्रवाशांना बाहेर निघता येत नव्हते. अशा परिस्थितीमध्येही सर्वजण धीराने प्रसंगाला सामोरे गेले. या सगळ्या प्रकारानंतर मेक्सिको विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. प्रवासी विमानातून बाहेर पडल्यानंतर सर्पमित्रांनी या सापाला ताब्यात घेतले. दरम्यान, हा साप विमानात कसा आला याची चौकशी करण्याचे आदेश एरोमेक्सिको कंपनीने दिले आहेत.

Story img Loader