वाढती लोकसंख्या, त्यांच्यासाठी बांधली जाणारी नवनवीन घरं, रस्ते, भले-मोठे पूल अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, मानवाने बिचाऱ्या मुक्या जनावरांची घरं-जंगलं तोडून टाकली. असे केल्यामुळे बिबट्या, साप, वानर, वाघ यांसारखी जंगली जनावरे मनुष्याने घडवलेल्या काँक्रीटच्या जंगलात घुसू लागली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
अशाच प्रकारची अजून एक घटना, राजस्थानमधील जयपूर येथे घडली असल्याचे, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडीओमधून समजते. ‘कानोटा कॅसल हेरिटेज हॉटेल’मधील एका कर्मचाऱ्याच्या खोलीत दिवसाढवळ्या बिबट्या घुसलेला होता. त्या खोलीत राहणारा कर्मचारी त्याच्या मुलाला शाळेमध्ये सोडण्यासाठी गेला असताना, तो बिबट्या खोलीत घुसला असल्याचा अंदाज आहे. कर्मचाऱ्याला खोलीमध्ये जंगली प्राणी असल्याचे लक्षात येताच, त्याने खोलीचे दार बाहेरून बंद करून घेतले.
हेही वाचा : “गं तुझं टप्पोरं डोलं…” गाणं म्हणणाऱ्या चिमुकलीनं नेटकऱ्यांना लावलं वेड! व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहा…
“सकाळच्या वेळी हॉटेलमधील कुत्र्यांनी अचानक भुंकणे सुरु केले, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला; तरीही ते शांत झाले नाहीत. त्यानंतर त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या पर्यटकांनी हॉटेलच्या मॅनेजरला त्यांना या आवारात बिबट्या दिसल्याचे सांगितले; तेव्हा त्यांनी ताबडतोब वन विभागाला कळवले. काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी तिथे येऊन, त्या बिबट्याला घेऊन गेले.” अशी माहिती वन विभागाच्या टीमने द टाइम्स ऑफ इंडियाला दिली.
हा व्हिडीओ, हॉटेलमधील खोलीच्या खिडकीतून शूट केलेला आहे. त्यामध्ये बिबट्याने संपूर्ण खोलीतील सामान अस्ताव्यस्त केलेले आपण पाहू शकतो. खिडकीमधून व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला बघताच अत्यंत चपळाईने, गुरगुर करत तो खिडकीजवळ आल्याचेदेखील पाहायला मिळते. त्याचबरोबर, बिबट्याला वन विभागाने शांत करण्यासाठी मारलेला बाण देखील त्या जंगली जनावराच्या पायाशी पाहू शकतो.
@ikaveri या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर होताच तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
“सकाळी आम्हाला, एका हॉटेलच्या परिसरात बिबट्या फिरताना दिसला आहे, अशी माहिती देणारा फोन आला. त्यानंतर वन विभागाची एक टीम आणि जयपूर प्राणीसंग्रहालयाची एक टीम त्या हॉटेलमध्ये पोहोचली. त्या बिबट्याला सुरक्षितरित्या नाहरगड बचाव केंद्रामध्ये नेण्यात आले आहे. त्या बिबटयावर थोडेसे औषधोपचार करून पुन्हा जंगलात सोडून दिले जाईल. दरम्यान कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही.” अशी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्याने दिल्याचे न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.
हेही वाचा : Recipe : प्रोटीन आणि फायबरयुक्त असा पौष्टीक हिरवा ढोकळा; काय आहे रेसिपी, प्रमाण पहा…
एक्स या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत, १९.७ K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.