Punjab Police Video: तरुण मंडळी रिल्स बनवण्यासाठी कधी काय करतील सांगता येत नाही. परंतु त्यांची ही रिल्सची हौस अनेकदा इतरांना भारी पडते. असाच काहीसा प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. जिथे एका पोलीस अधिकाऱ्याने ड्युटीवर असताना पोलिसांचे अधिकृत वाहन रिल्ससाठी तरुणीला वापरण्याची परवानगी दिली, ज्यामुळे पोलिस अधिकाऱ्याला कामावरून निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या तरुणीचा पोलिसांच्या वाहनाबरोबर रिल्स बनवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या वाहनावर बसून काढली रिल्स
एका सोशल मीडिया इन्फ्युएंसरला रिल्स बनवण्यासाठी अधिकृत पोलिस वाहन वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल जालंदरचे पोलिस आयुक्त कुलदीप चहल (IPS) यांनी निरीक्षक/एसएचओ अशोक शर्मा यांना निलंबित केले आहे. पंजाब पोलिसांचे अधिकृत वाहन म्हणून ओळखल्या जाणार्या महिंद्रा स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून ही तरुणी बसलेली दिसत आहे. ती वाहनाच्या बोनेटवर बसून पंजाबी गाण्यावर पोज देताना दिसली आणि नंतर कॅमेऱ्याकडे बसून हातांनी अश्लील हावभाव केले. यावेळी पंजाब पोलिसांचा एक शिपाई हा सर्व प्रकार सुरु असताना तिथे उपस्थित होता.
पंजाब पोलिसांनी एसएचओवर नेमकी काय कारवाई केली याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी एसएचओला काही दिवस किंवा आठवड्यांसाठी निलंबित केले आहे. मात्र, या सोशल मीडिया इन्फ्युएंसर तरुणीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कारण या तरुणीने पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच हा व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे तिच्यावर पोलीस कारवाई करणे अन्यायकारक ठरु शकत होते. तरीही सार्वजनिक ठिकाणी असभ्य कृत्ये करणे किंवा पोलिसांच्या वाहनसह सार्वजनिक मालमत्तेचा वापर करणे भारतात बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.