टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलवर काही अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. याशिवाय लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला, पण या हल्ल्यातून कसा तरी स्वतःचा बचाव करण्यात तो यशस्वी झाला. किलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या घटनेची माहिती दिली आहे. यासोबत त्याने स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तो जखमी दिसत आहे.

किली पॉलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘माझ्यावर ५ जणांनी हल्ला केला, माझ्या उजव्या हाताच्या बोटाला चाकूने जखम झाली आणि मला ५ टाके पडले. याशिवाय मला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, तरी दोन जणांना मारहाण करून मी स्वतःचा बचाव करू शकलो आणि तेथून पळ काढला. माझ्यासाठी प्रार्थना करा.’ किली पॉलने २९ एप्रिल रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या घटनेबद्दल सांगितले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात टांझानियाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भाऊ-बहिणीचे कौतुक केले होते. किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल यांच्या लिपसिंक कलेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. या दोघांनाही भारतीय संगीताची आवड, क्रेझ आहे आणि म्हणूनच ते खूप लोकप्रिय आहेत, असे पंतप्रधान म्हणाले होते. पंतप्रधानांच्या या स्तुतीनंतर दोघांची लोकप्रियता झपाट्याने वाढली होती.

किली पॉलचे सध्या इंस्टाग्रामवर ३६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. भारतात त्याच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे त्यांनी बॉलीवूड गाण्यांवर केलेले लिपसिंक. बॉलीवूड गाणी आणि डायलॉग्स लिपसिंक करून ही दोन्ही भावंडं भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहेत. इतकंच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी किली पॉलला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. जेव्हा किली पॉलला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, बॉलीवूडमधील गाण्यांवर तुम्ही इतक्या सुंदरपणे लिप सिंक कसे करता, तेव्हा तो म्हणाला की जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती करण्याचा कोणता ना कोणता मार्ग तयार होतोच.

Story img Loader