चोरीच्या घटनांमध्ये ज्याचं सामान चोरीला गेलंय, त्याचं मोठं नुकसान झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. पण एका चोरानं केलेली चोरी थेट त्याच्या जिवावर बेतल्याचा प्रकार ब्राझीलमध्ये घडला आहे. या घटनेचं थरारक सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चोरानं एका वृद्ध व्यक्तीचा मोबाईल चोरल्याचं दिसत आहे. पण त्यानंतर घडलेल्या घटनेमुळे या अल्पवयीन चोराचा मृत्यू ओढवल्याचं धक्कादायक CCTV फूटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आहे.
नेमकं घडलं काय?
ही घटना ब्राझीलच्या सॅन पाओलोमधील असल्याचं सांगितलं जात आहे. एक ७१ वर्षीय व्यक्ती रस्त्याने जात असताना एका चोरट्यानं त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला. पण या गडबडीत समोरून येणाऱ्या बसकडे त्याचं दुर्लक्ष झालं. हा चोर बसखाली आला. या घटनेत या चोराचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या चोराचं वय अवघं १७ वर्षं असल्याचं समोर आलं आहे.
CCTV फूटेजमध्ये काय आहे?
हा अपघात एका चौकात झाल्याचं या घटनेच्या CCTV फूटेजवरून दिसून येत आहे. रस्त्याच्या फुटपाथवरून ही वृद्ध व्यक्ती चालताना मोबाईलवर बोलत होती. त्याचवेळी समोरून हा चोर आला आणि त्यानं या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला. पण तिथेच रस्ता डावीकडे वळत होता. त्यामुळे चोरानं रस्ता ओलांडून पलीकडच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पण चोराचा अंदाज चुकला. उजवीकडच्या रस्त्याने येणारी सिटीबस चोरट्याला दिसली नाही. या बसची चोरट्याला धडक बसली. काही अंतरापर्यंत हा चोर बसच्या खाली फरफटत गेल्याचंही व्हायरल सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.
अपघातानंतर आसपासच्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या चोराला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. पण तिथे उपचारांदरम्यान चोराचा मृत्यू झाला. यासंदर्भात स्थानिक पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.
रस्त्यावरून चालताना सावध राहा!
व्हायरल CCTV फूटेजमुळे या प्रसंगी नेमकं काय घडलं, हे उघड झालं. या घटनेतील वृद्ध व्यक्तीप्रमाणेच आपल्यापैकी अनेकजणांना चालताना मोबाईलवर बोलण्याची सवय असते. अनेकदा कामाच्या धावपळीत महत्त्वाचे कॉल उचलण्यासाठी अनेकजण अशाप्रकारे चालता-चालता मोबाईल फोनवर बोलताना दिसतात. पण आपल्या घाईगडबडीचा फायदा अशी चोर मंडळी घेण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशावेळी आपण अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.