Solo Traveller हल्ली अनेक महिला, अनेक तरुण एकटेच प्रवासाला जातात. सोलो ट्रिप म्हणजेच स्वतःचीच सोबत करणं त्यांना आवडतं. दरम्यान अशा काही प्रवासांमध्ये वाईट अनुभवही येतात. एका महिलेने तिला आलेला असाच एक वाईट अनुभव व्हिडीओ पोस्ट करत सांगितला आहे.

नतालिसी टकसिसी नावाच्या तरुणीने नेमकं काय सांगितलं?

नतालिसी टकसिसी नावाच्या तरुणीला हा वाईट अनुभव आला आहे. ही तरुणी थायलंडची आहे. ती जपान या ठिकाणी फिरायला आली तेव्हा एका धक्कादायक अनुभवामुळे आपण कसे हादरुन गेलो हे व्हिडीओ पोस्ट करत या तरुणीने सांगितलं आहे. ही तरुणी म्हणाली, जपान महिलांसाठी सुरक्षित असेल असं वाटलं होतं. पण मी ज्या प्रसिद्ध हॉटेलचं बुकिंग केलं होतं तिथेच मला वाईट अनुभव आला. मी हॉटेल रुममध्ये उतरले. पहिला दिवस खूपच छान गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी रुममध्ये आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार मी अनुभवला.

मी रुमवर आल्यावर बेडवर झोपले, मला दुर्गंधी येऊ लागली आणि..

नतालिसी म्हणाली, मी दुसऱ्या दिवशी फिरुन संध्याकाळी ७.३० च्या सुमारास हॉटेल रुमवर आले. कपडे बदलले आणि बेडवर पहुडले. त्यावेळी मला दुर्गंधी येऊ लागली. सुरुवातीला मला वाटलं माझ्या केसांमधून हा वास येतो आहे. त्यानंतर मी माझ्या बेडच्या खाली पाहिलं तर एक माणूस माझ्या बेडमध्ये होता आणि तो माझ्याकडे बघत होता. मी ती नजर कधीही विसरु शकत नाही. मी त्याला पाहून किंचाळलेच. त्यानंतर तो माणूसही बाहेर आला तो देखील किंचाळला आणि तिथून बाहेर पळाला.

हॉटेलने माझे पैसे परत केले नाहीत-नतालिसी

नतालिसी पुढे म्हणाली मी घडला प्रकार तातडीने हॉटेलच्या स्टाफला हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी जेव्हा माझी रुम तपासली तेव्हा त्यांना यूएसबी केबल आणि पॉवर बँक सापडली. या हॉटेलचे सीसीटीव्हीही काम करत नव्हते असंही नतालिसीने तिच्या व्हिडीओत सांगितलं. मी त्या हॉटेल रुमसाठी ५१० डॉलर्स खर्च केले होते. मी ते पैसे परत मागितले. मात्र हॉटेल प्रशासनाने मला पैसे परत दिले नाहीत. मी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले हे पाहून नंतर मला थोडे पैसे परत करण्यात आले. यानंतर नतालिसीने सांगितलं की मी त्याच दिवशी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले. मला अद्यापही तक्रार केल्याची प्रत मिळालेली नाही. जपानमध्ये मी सोलो ट्रीप करायला आले होते. माझा एक दिवस खूप आनंदात गेला. मात्र दुसऱ्या दिवशी जे घडलं त्यामुळे मी अजूनही धक्क्यात आहे. माझ्या रुममधल्या बेडमध्ये एक माणूस लपून बसला होता. कदाचित त्याला माझे व्हिडीओ काढायाचे असतील, चोरी करायची असेल किंवा इतर काहीही. मात्र मी त्या प्रसंगाने खूप घाबरुन गेले आहे असं नतालिसीने स्पष्ट केलं.

नतालिसीने काय घडलं ते सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ २० लाख लोकांनी पाहिला आहे. तसंच लोकांनी हे हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्मवरुन रद्द करा असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने APA हॉटेल हे प्रसिद्ध हॉटेल आहे पण तिथे मुलींनी महिलांनी एकटीने जाऊ नये कारण ते तसं सेफ नाही असंही म्हटलं आहे.