मानवी जीवन एक प्रकारचा खाचखळग्यांनी भरलेला प्रवासच आहे. आयुष्याच्या या प्रवासात कोणावर कधीही कोणता प्रसंग ओढावेल याचा काहीच नेम नाही. मग ते आपल्या वाटांच्या मध्ये येणारे अडथळे असोत किंवा जीवावर बेतलेलं एखादं संकट असो. संकटं काही सांगून येत नाहीत. अशा बिकट वेळी भांबावून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करुन संकटांवर सहज मात करता येऊ शकणाऱ्या या काही टिप्स.
* इतरांची मदत घ्या- सहसा गर्दीच्या ठिकाणी अनेकदा असे काही प्रसंग उद्भवतात ज्यावेळी काय करावे हे सुचत नाही. पण जर असा एखादा प्रसंग किंवा संकट तुमच्या समोर आलं तर, इतरांची मदत घ्यायला अजिबात उशीर लावू नका. वर्दळीच्या ठिकाणीही मदतीसाठी अनेकजण पुढे सरसावतात यात शंकाच नाही.
* रुल ऑफ थ्री- बचावकार्यातील तज्ज्ञांच्या मते कोणीही माणूस हवेशिवाय तीन मिनिटे, अतिशय बिकट परिस्थितीत निवाऱ्याशिवाय तीन तास पाण्याशिवाय तीन तास आणि खाण्याशिवाय तीन आठवडे जिवंत राहू शकतो.
* आगीपेक्षा धुराचा धोका जाणा- अनेकदा काही कारणांनी आग लागल्यामुळे त्या घटनेमध्ये बऱ्याचजणांचा मृत्यु ओढावल्याच्या घटना घडल्या आहेत. पण या मृत्युंच्या घटनांमागचे खरे कारण आग नसून त्या आगीमुळे पसरलेला धुर आहे. आगीमध्ये होरपळण्यापेक्षा धुरामुळे घुसमटून मृत्यु होण्याचे प्रमाण जास्त आहे अशी माहिती एका निरिक्षणादरम्यान समोर आली आहे. त्यामुळे जर अशा एखाद्या प्रसंगात तुम्ही अडकलात तर, धुरामध्ये श्वास घेताना अतिशय वेगाने आणि दिर्घ श्वास घेऊ नका.
* पाण्याचे महत्त्व जाणा- हाइकिंग दरम्यान जर तुम्ही वाट चुकलात तर वाहते पाणी नेहमीच तुम्हाला वाट शोधण्यासाठी मदत करु शकेल. कारण पाणी उंचवट्याकडून उताराच्या दिशेने वाहते. अनेकदा पाण्याच्या या वाहत्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यास काही अंतरावर मानवी वस्तीसुद्धा असते. त्यामुळे पाण्याचे महत्त्व फार असून हेच पाणी तुमच्या वाटाड्याची भूमिकाही बजावू शकतं हे विसरु नका.
* पाण्याची पातळी ओळखा- पर्वतीय प्रदेशांमध्ये सहसा पर्यटक नद्यांच्या आणि तिथल्या नैसर्गिक सौदर्याला भुलतात. पण, अनेकदा पावसाच्या दिवसांमध्ये नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढते आणि ते लक्षात न आल्यामुळे आजवर अनेकांचे प्राणही गेले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी नदीत उतरताना किनाऱ्यावर एक निशाण लावून ठेवा. जेणेकरुन पाण्याची पातळी वाढत असल्याचे लक्षात येताच पाण्यातून बाहेर येणे सोयीस्कर पडेल.
* भिजणे टाळा- हवेपेक्षा पाणी शरीराला घातकही ठरतं. त्यामुळे ओल्या अंगामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. त्यामुळे सहसा स्वत:ला ओले होण्यापासून दूरच ठेवणे उत्तम.
* बर्फ खाणं टाळा- बर्फाळ ठिकाणी गेल्यावर अनेकांना तेथील बर्फ खाण्याचा मोह आवरत नाही. त्यातही जर तहान लागली तर तो भुसभुशीत बर्फाचा गोळा उचलण्याकडेच बऱ्याचजणांचा कल असतो. पण, असे केल्याने शरीरातील उष्णतेची घट होते याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे बर्फ खाण्याचा कितीही मोह झाला तरीही त्याला आवर घाला.
* रस्त्यावर वावरताना भान ठेवा- एकाच वेळी विविध कामे करु शकतो असे आपण कितीही तोऱ्यात म्हटले तरीही काही प्रसंगांमध्ये मात्र ते घातक आणि निव्वळ अशक्य असते. त्यामुळे गाडी चालवत असताना किंवा रस्त्यावरुन चालताना मोबाईलचा वापर शक्यतो टाळा. रस्त्यांवरुन जात असताना मोबाईलच्या नादात आजवर अनेकांनी अपघातांना आमंत्रण दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा