भारतीय हवाई दलाने २००९ साली मिकोयान गुरेवीच मिग २३ बीएन हे फायटर जेट अलिगढ मुस्लीम विद्यापीठाला (एएमयू) भेट दिलं होतं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ३ ऑगस्ट रोजी कॅम्पसमध्ये स्मारकारच्या स्वरुपात उभ्या असणाऱ्या या मीग २३ विमानाचे फोटो ओएलएक्स या जुनं सामानं विकणाऱ्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध म्हणत अपलोड करण्यात आले होते. हे विमान ९ कोटी ९९ लाख रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहीरात या वेबासाईटवर अपलोड करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आता विद्यापिठाने चौकशी सुरु केली आहे. यासंदर्भातील बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
कॅम्पसमधील भारतीय हवाईदलाच्या विमानाचे फोटो ओएएक्सवर टाकण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यापिठाने ओएलएक्सशी संपर्क करुन ही जाहिरात हटवण्याची विनंती केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ओएलएक्सने तातडीने ही जाहिरात साईटवरुन काढून टाकली. विद्यापिठाचे नाव खराब करण्यासाठी मुद्दाम कोणीतरी ही जाहिरात पोस्ट केला असल्याचे संक्षय व्यक्त केला जात आहे. “ओएलएक्सवर या विमानाच्या विक्रीसंदर्भात पोस्ट करण्यात आलेली माहिती चुकीची आहे. हे विमान विकण्याची किंवा त्याचा लिलाव करणाऱ्याचा विद्यापिठाचा कोणताही विचार नाहीय. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. हे विद्यापीठाचे नाव खराब करण्यासाठी केलेलं आहे,” असं विद्यापीठाचे प्रॉक्टर असणाऱ्या मोहम्मद वसिम अली यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.
The post on OLX about the sale of aircraft installed in the campus is wrong. University has not taken any step to auction or sell it. We are looking into the matter. It’s an attempt to defame the university: Mohd Wasim Ali, Aligarh Muslim University (AMU) Proctor (03.08.2020) pic.twitter.com/ht5OR1O50h
— ANI UP (@ANINewsUP) August 3, 2020
आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून हे फोटो ओएलएक्सवरुन काढून टाकण्यात आले आहेत. विद्यापीठाची बदनामी करण्यासाठी कोणीतरी जाणूनबूजून हे करत आहे, असं अली यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे. एएमयूमधील इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मिग २३ विमानांमधील वेगवेगळे भाग, तंत्रज्ञान, डिझाइन या गोष्टींचा समावेश आहे. एरोनॉटिकल इंजिनियरिंग ही मेकॅनिकल इंजिनियरिंगची शाखा असून विद्यार्थ्यी यासंदर्भातील शिक्षण कॉलेजमध्ये घेतात असं झाकीर हुसैन कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे मुख्याध्यापक असणाऱ्या प्राध्यापक एम. एम. सुफयान बेग यांनी सांगितलं आहे.
विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच स्मारक म्हणून फायटर विमानाचे इन्सटॉलेशन करणाऱ्या देशातील पहिल्या सात विद्यापीठांमध्ये एमएमयूचा समावेश होतो. तर अशाप्रकारे कॅम्पसमध्येच विमानाचे इन्स्टॉलेशन करणारं एमएमयू हे उत्तर प्रदेशमधील पहिलेच विद्यापीठ आहे.
मिग-२३ हे रशियन बनावटीचे विमान आहे. हे विमान १९७० च्या काळामध्ये बनवण्यात आली आहेत. या विमानांचा २४ जानेवारी १९८१ रोजी भारतीय हवाई दलामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अत्याधुनिक विमानांमुळे २८ वर्षांनी म्हणजेच ६ मार्च २००९ रोजी ही विमाने हवाई दलामधून निवृत्त करण्यात आली.
या पूर्वीही ओएलएक्सवर स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्यासंदर्भातील जाहिरात पोस्ट केल्याचे प्रकरण समोर आलं होतं.