आई-वडील आपल्या मुलांना खूप कष्ट करुन शिकवतात, त्यांना हवी ती गोष्ट पुरवतात. शिवाय या बदल्यात ते आपल्या मुलांकडे काहीही आपेक्षा ठेवत नाहीत. मात्र, आपल्याला लहानाचं मोठं करणाऱ्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणात आधार देणं, त्यांचा सांभाळ करणं प्रत्येक मुलाची जबाबदारी असते. पण आजकाल अनेक मुलं आपल्या आई-वडिलांचा साभांळ करत नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, राजस्थानमधील चित्तोडगड येथील एका आईने आपल्या मुलाला खूप शिकवंल तो मोठा माणूस बनला, करोडपती झाला आणि त्या मुलाने आता या आईला घरातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे आता म्हातारी आई दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. याआधीही मुलगा आईकडून घरातील सर्व कामे करून द्यायचा. घरात राहायचे असेल तर सुनेच्या अटींचे पालन करून तिला सुखी ठेवावे लागेल, अशी अट त्यांने आपल्या आईला घातली होती. नंतर त्याने आईचे दागिने हिसकावून घेतले आणि तिला घराबाहेर काढले.
रिपोर्टनुसार, चित्तौडगडमधील प्रताप नगरमध्ये राहणाऱ्या कमला देवी यांना मुलगा नव्हता म्हणून त्यांनी ११ महिन्यांचा मुलगा दत्तक घेतला होता. आता तो सुशिक्षित होऊन करोडपती बनला आहे. पण आता तो आपल्या आईला बायकोचे कपडे धुवायला, हातपायांची मालिश करायला लावतो. शिवाय घरात राहायचं असेल तर बायकोला खुश ठेवावं लागेल, असंही त्यांने आपल्या आईला सांगितलं आहे.
हेही वाचा- लग्नाची अट मान्य करत सुशिक्षित तरुणाने केलं दोन सख्ख्या बहिणींशी लग्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मोलमजुरी करुन आई भरते पोट –
मुलाने घरातून बाहेर काढल्यामुळे दुसऱ्याच्या घरातील कामं करणाऱ्या कमला देवी यांनी सांगितलं, “मला अशाप्रकारे मारहाण करण्यात आली की, रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.” कमला देवीच्या म्हणण्यानुसार, मारहाणीमुळे त्यांचे हात आणि पाय नीट काम करत नाहीत. शिवाय दोन वर्षांपासून आपण पोलिसांकडे तक्रार करुनही त्यांनी काही कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, सध्या काही सामाजिक कार्यकर्ते कमला देवी यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.