७ सप्टेंबरला अॅपलने ‘आयफोन ७’ आणि ‘आयफोन ७ प्लस’ची घोषणा केली. पण या फोनच्या किंमतीचा आकडा पाहिला तर खिशाला मोठी कात्री लागली नाही तर नवलच म्हणावे लागले. पण जगात असेही काही लोक असतात त्यांना किंमतीशी फारसे घेणे देणे नसते. आता हेच बघाना चीनमधल्या एका तरुणाने स्वत:साठी नाही तर चक्क आपल्या कुत्र्यासाठी ८ आयफोन खरेदी केले. आता त्या कुत्र्याला फोनमधले काय कळणार आहे म्हणा पण उगाच हौस म्हणून त्याने आपल्या कुत्र्यासाठी ८ फोन खरेदी केले. कुत्र्याच्या शेजारी या आयफोनचा मनोरा रचून त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर टाकले.

‘ अॅपल आयफोन ७’ च्या खरेदीची रांग सोडण्याकरता त्याला सव्वा लाखांची ऑफर

चीनी माध्यमाच्या मते हा तरूण चीनमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या वांग जियानलिन यांचा मुलगा आहे. २८ वर्षांच्या या तरुणाचे नाव वांग सिकोंग आहे, त्याचे आपल्या कुत्र्यावर खूपच प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच त्याने चक्क आठ आयफोन त्याला भेट म्हणून दिले. यातल्या एकाच आयफोनची किंमत जवळपास ६९ हजार रुपये आहे. चीनच्या विबो या सोशल मीडिया साईटवर यासंबधीची बातमी प्रकाशीत झाली. वांग सिकोंगकडे जवळपास ३७०० कोटींची संपत्ती आहे. इतकेच नाही तर त्याच्या लाडक्या कुत्र्याचे सोशल मीडियावर अकाउंट देखील आहे. याच अकाउंटमधून हे फोटो सोशल मीडियावर टाकले गेले. आधीही वांगने आपल्या कुत्र्याला अॅपलचे सगळ्यात महागडे घड्याळ दिले होते. चीनमध्ये गेल्याच आठवड्यात अॅपलने आयफोनचे वितरण करायला सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी वांगने आपल्या कुत्र्यासाठी आयफोन विकत देखील घेतले.

 

Story img Loader