बॉलिवुड अभिनेता सोनू सूद यानं गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात केलेलं मदतकार्य आख्ख्या देशानं पाहिलं. मग ते स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी असो किंवा लॉकडाउनमुळे पोटाला उपवास घडणाऱ्या गरजूंसाठी असो, सोनू सूद या हजारो लाखो नागरिकांना मदत करताना दिसून आला आहे. आज ऑक्सिजन, रेमडेसिविर याचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना त्याचा तातडीने पुरवठा करण्याचा प्रयत्न देखील सोनू सूदने सुरू ठेवला आहे. सोनू सूदच्या याच परोपकारी वृत्तीचा ताजा अनुभव घेतलाय तो क्रिकेटपटून सुरेश रैना याने! सुरेश रैनाने ट्विटरवर त्याच्या नातेवाईकासाठी ऑक्सिजन सिलेंडर तातडीने हवा असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावर लगेचच सोनू सूदचा रिप्लाय आला आणि त्यानं आवश्यक तिथे ऑक्सिजन पुरवला देखील! यामुळे भारावलेल्या सुरेश रैनाने सोनू सूदचे मनापासून धन्यवाद मानले!

नेमकं झालं काय?

गुरुवारी संध्याकाळी क्रिकेटपटू सुरेश रैनाने एक ट्वीट केलं. यामध्ये मीरतमध्ये राहणाऱ्या त्याच्या ६५ वर्षीय काकीसाठी तातडीने ऑक्सिजनची गरज असल्याचं त्याने म्हटलं होतं. या ट्वीटमध्ये रैनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं होतं. पण योगी आदित्यनाथ यांचा रिप्लाय येण्याआधीच रिप्लाय आला तो अभिनेता सोनू सूदचा!