सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. चांगली, वाईट कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर पटकन व्हायरल होते. मोठ्यांइतकेच लहान मुलांमध्ये देखील याचे क्रेझ पाहायला मिळते. अनेक विचित्र चाळे करत व्हिडीओ बनवण्यासाठी धडपडणारी अनेक लहान मुलं आपण सोशल मीडियावर पाहतो. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ इतर व्हायरल प्रकारापैकी डान्स, गाणी किंवा स्टंट करतानाचा नाही, तर एका गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधणारा हा आहे.
हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलाचे नाव सरफराज आहे. सरफराज रिपोर्टींग करत त्याच्या शाळेच्या वाईट अवस्थेचे वर्णन करत आहे. संपुर्ण शाळेचा परिसर, शाळेतील वर्ग, शौचालय यांची वाईट परिस्थिती तो रिपोर्टींग करत व्हिडीओमध्ये दाखवत आहे. ही शाळा झारखंडमधील आहे. “शाळेतील वर्ग हे नावापुरतेच वर्ग आहेत, शाळेच्या आजूबाजूला जंगलप्रमाणे झाडं उगवली आहेत, शाळेसाठी अजुनही पाण्याची सोय झालेली नाही, त्यामुळे शौचालयाची अवस्था खूप वाईट आहे” असे वर्णन सरफराज व्हिडीओमध्ये करत आहे. सरफराजच्या या समस्येची दखल अभिनेता सोनू सूदने घेतली आहे.
आणखी वाचा – ‘कही भी जाओ बेहेन बस…’; दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेला ‘अनुपमा’चा व्हिडीओ पाहिलात का?
VIRAL VIDEO : स्वत:च्या शिक्षणासाठी ही मुलगी विकतेय पाणीपुरी; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
अभिनेता सोनू सूदने सरफराजला मदतीचा हात दिला आहे. सोनू सुदने हा व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये सोनू सूदने लिहले आहे, ‘सरफराज आता यापुढची रिपोर्टिंग नवीन शाळेतून कर. तयारी सुरू कर नवी शाळा आणि नवे हॉस्टेल तुझी वाट बघत आहेत.’ अभिनेता सोनू सूदच्या मदतीने आता सरफराजला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळणार आहे. नेटकरी या मदतीबद्दल सोनू सूदची प्रशंसा करत आहे. रील आयुष्यात खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद रिअल म्हणजेच खऱ्या आयुष्यात ‘हिरो’वची भूमिका चोख बजावत आहे. सोनू सूदने अनेकांना असा मदतीचा हात दिला आहे. सोनू सूदच्या या पुढाकारामुळे सरफराजला उच्च शिक्षित होऊन त्याची स्वप्न पूर्ण करण्यास नक्की मदत होईल.