निवडणुका म्हटलं की आश्वासनांचा पाऊस पडतो. हे मोफत ते मोफत सांगत नेतेमंडळी मतदारांना आकर्षित करतात. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकापेक्षा एक अशी आश्वासनं देतात. या आश्वासनांची भूरळ पडल्याने अनेक जण त्यांच्या पारड्यात मतं टाकतात. निवडणुकीनंतर मतदारांना काहीच मिळत नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. असं असलं तरी आश्वासनांचा पाऊस पडणं काही कमी होत नाही. एक निवडणूक सरली की घोषणा हवेत विरतात. आता हे नित्याचंच झालं आहे. त्यामुळे निवडणुका आल्या लोकांना लोकप्रिय घोषणा ऐकाण्याची सवय झाली आहे. त्यासोबत घोषणांबाबत उत्सुकताही असते. सध्या दक्षिण कोरियात निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. या निवडणुकीत रस्ते, वीज, पाणी यापेक्षा केस गळतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ली जे म्युंग यांनी जिंकल्यास सरकार केस गळतीवर मोफत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून तरुणांमध्ये केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे. तरुणांमधील ही समस्या दक्षिण कोरियातील राजकारण्यांनी बरोबर हेरली आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ली जे म्युंग यांनी केलेल्या घोषणेचं टक्कल असलेल्या लोकांनी स्वागत केलं आहे. विरोधकांनी यांनी जे म्युंग यांच्या घोषणेवर टीकास्त्र सोडलं आहे. मतांसाठी किती खालची पातळी गाठणार असा प्रश्न उपस्थित करून टीका केली आहे. दक्षिण कोरियात मागच्या निवडणुकीत उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम, अमेरिकेसोबतचे संबंध आणि आर्थिक स्थिती हे मुद्दे गाजले होते. आताच्या निवडणुकीत केस गळती हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Video: स्टंट करणं तरुणाला पडलं महागात; चालत्या गाडीचे झाले दोन तुकडे

दक्षिण कोरियात प्रत्येक पाच पैकी एका व्यक्तीला केस गळतीच्या समस्येला सामोरं जाव लागत आहे. हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च सरकारी विम्यात नसल्याने खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. हा मुद्दा लक्षात घेत जे म्युंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, ‘हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च राष्ट्रीय आरोग्य विम्यातून केला पाहीजे. यासाठी एक धोरण आखलं जाईल.’