दक्षिण कोरियाची एक महिला युट्यूबर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच तिची छेडछाड केल्याची संतापजन घटना मुंबईत घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची नोंद मुंबई पोलिसांनी घेतली असून छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दक्षिण कोरियातील एक महिला यूट्यूबर मोबाईवर लाइव्ह स्ट्रीमिंग करताना दिसतं आहे. त्याचवेळी दोन तरुण तिच्याजवळ येत तिच्याशी जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसतं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे युट्यूबर महिला विरोध करत असताना आरोपी तिचा चेहरा बळजबरीने स्वत:कडे ओढत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
महिलेला हे दोन तरुण तिच्याशी काही गैरकृत्य करत असल्याचं लक्षात येताच तीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला तिचं लाइव्ह स्ट्रीमिंग करत पुढे निघून गेल्यानंतरही छेडछाड करणारे दोन्ही तरुण तिचा पाठलाग करत, तिची इच्छा नसताना तिला बळजबरीने तिला लिफ्ट द्यायचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहेत.
या घटनेचा व्हिडीओ आदित्य नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला असून हा व्हिडीओ मुंबई पोलिसांना टॅग करत लिहलं आहे की, “दक्षिण कोरियाच्या महिला खार परिसरात रात्री ८ च्या सुमारास हजारांहून अधिक लोकांसमोर, युट्यूबवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना काही तरुणांकडून तिची छेडछाड करण्यात आली आहे. ही घटना संतापजनक असून महिलेशी छेडछाड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी.” अशी मागणी त्याने ट्विटद्वारे केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला या घटनेबात त्यांच्याकडे कोणतीही तक्रार आली नसली तरी आम्ही प्रकरणाची चौकशी करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर आता महिलेशी छेडछाड केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर आयपीसी ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.