जपानचे ‘स्पेस वर्ल्ड थीम पार्क’ हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कारण, या थीम पार्कमध्ये स्केटिंग रिंग बनवण्यासाठी चक्क ५ हजार मासे आणि इतर सागरी जलचरांना गोठवण्यात आले. त्यामुळे, अनेक प्राणी प्रेमी संघटनांनी यावर सडकून टीका केली आहे.

वाचा : ७ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन शहराचा लागला शोध

जपानच्या फुकुओमध्ये असणारे स्पेस वर्ल्ड थीम पार्क हे नावाप्रमाणे विविध संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे, हे आगळे वेगळ थीम पार्क पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या थीम पार्कला भेट देतात. या थीम पार्कमध्ये स्केटिंग या खेळासाठी जमीन अर्थात बर्फाची रिंग बनवण्यात आली. विशेष म्हणजे ही जमीन अधिक आकर्षक दिसावी यासाठी बर्फाच्या खालच्या थराला विविध प्रजातीचे सागरी जलचर आणि मासे गोठवलेल्या स्वरुपात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या स्केटिंग रिंगवर स्केटिंग करताना खाली सागरी जलचर फिरत असल्याचा आभास होतो. जगामध्ये अशा प्रकारची कल्पना वापरून पहिल्यांदाच जमीन बनवण्यात आली आहे. त्यामुळे, अल्पावधितच हे थीम पार्क लोकांच्या आकर्षणाचा विषय बनला. या थीम पार्कच्या अधिकृत फेसबुक पेजवर याचे फोटो टाकण्यात आले. यातल्या एका फोटोत तर काही माशांचे अर्धे शरीर गोठलेल्या स्वरुपात दिसत आहे. तर खेकडे, शिंपले इतर जलचर ही या पार्कमध्ये गोठलेल्या स्वरुपात आहेत. गेल्याच आठवड्यात हे थीम पार्क सामान्य माणसांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर यावर टीका करण्यात आली. सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया पाहून अखेर या थीम पार्कने माफी मागितली आहे.

वाचा :  ९ कोटींचा ‘युवराज’ पहिलात का?

स्केटिंग रिंग बनवण्यासाठी वापरण्यात आलेले मासे हे आधिच मृतावस्थेत असल्याचे थीम पार्ककडून सांगण्यात येत आहे. हे मासे मृतावस्थेत असताना मासळी बाजारातून मासे विक्रेत्यांकडून ते घेण्यात आले होते असेही पार्कने दिलेल्या माफीनाम्यात म्हटले. कोणत्याही जीवंत माश्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण आता संपूर्ण प्रकारणावर चौकशी सुरू आहे.

Story img Loader