भाजपाच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ पदयात्रेला सुरुवात झाली आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या या यात्रेचे ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात आगमन होईल. राज्यात जवळपास १४ दिवस ही यात्रा चालेल. या यात्रेवर अनेक नेत्यांनी टीका केली असली तरीही बऱ्याच नामवंतांनी या यात्रेत सहभागही दर्शवला.
या यात्रेशी संबंधित अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांनी भररस्त्यात स्वतःला चाबकाचे फटके मारून घेतल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. भारत जोडो यात्रेच्या ५७ व्या दिवशी राहुल गांधींनी तेलंगणा येथे सुरु असणाऱ्या बोनालू महोत्सवात हजेरी लावली होती. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या या यात्रेतील एक नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी एका मुलाबरोबर कराटेचा सराव करताना दिसत आहेत.
गुरुवारी ४ नोव्हेंबरला काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आपण राहुल गांधी यांना एका लहान मुलाबरोबर पाहू शकतो. कराटेचा गणवेश घातलेला हा मुलगा राहुल गांधी यांच्या हातावर पंच मारत आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी हे स्वतः ब्लॅक बेल्ट आहेत. यावेळी ते या मुलाला कराटेच्या योग्य टेक्निक शिकवताना दिसत आहेत.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “टेक्निक चुकीची असेल तर देश विनाशाच्या मार्गावर जातो. हा तर मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. राहुल गांधी एका मुलाला कराटेच्या योग्य टेक्निक सांगत आहेत”. दरम्यान हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख ८९ हजारांहूनही अधिकवेळा पाहिला गेला असून नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.